
पुणे :-अनधिकृतपणे सुरू असलेल्या पॅथॉलॉजी लॅब संधार्बत अनेक तक्रारी आरोग्य विभागास प्राप्त झाले आहेत.अवास्वत शुल्क आकारणी करून कायद्याचे उल्लंघन करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. पॅथॉलॉजी लॅब चालवण्यासाठी संबंधित पॅथॉलॉजिस्ट आणि कर्मचाऱ्यांकडे आवश्यक पात्रता आहे का, याची तपासणी महापालिकेतर्फे केली जाणार आहे. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू असलेल्या पॅथॉलॉजी लॅबच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. पुण्यात सद्यस्थितीत ५८० पॅथॉलॉजी लॅब असून, त्यांनी सर्व तपशील आरोग्य विभागाला सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. माहिती सादर न करणाऱ्या आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यात येणार आहे. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी पदवी, पदविका नसताना आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसताना अनेक जण राज्यात पॅथॉलॉजी लॅब थाटून आहेत; तसेच कॉर्पोरेट पॅथ लॅब रक्ताचे नमुने संकलन करणारे तंत्रज्ञ म्हणून घरोघरी जाऊन नमुने घेतात. काही एम. डी. पॅथॉलॉजी डॉक्टर अप्रशिक्षित व वैद्यक परिषदेची नोंदणी नसलेल्या व्यक्तींना कमिशन देऊन लॅब चालवतात, असे महाराष्ट्र परावैद्यक परिषदेने काढलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कारवाई करण्याच्या आदेश देण्यात आला आहे. पुणे विभागीय आरोग्य सेवा उपसंचालकांनी याबाबत महापालिका आरोग्य विभागाला पत्र दिले आहे. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व पॅथॉलॉजी लॅबची तपासणी करावी आणि लॅब कार्यरत नसल्यास कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालये आणि पॅथॉलॉजी लॅबना पत्र पाठवून पॅथॉलॉजिस्टना माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरातील सर्व नोंदणीकृत पॅथॉलॉजी लॅबना पत्र पाठवले आहे. मुख्य पॅथॉलॉजिस्टसह त्यांच्या कर्मचाऱ्यांचे तपशील आठ दिवसांत सादर करण्यास सांगतिले असून, तपशील आल्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.- डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी