अपकमिंग प्रोजेक्ट:रितेशच्या ‘वेड’मध्ये सलमान खानचा कॅमिओ, लवकरच एका खास गाण्याचे करणार चित्रीकरण

रितेशच्या ‘वेड’मध्ये सलमान खानचा कॅमिओ,

12 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे ‘वेड’

अभिनेता रितेश देशमुख लवकरच आगामी ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. रितेशच्या या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलिया डिसूजा-देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून ती मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. आता या चित्रपटात सलमान खानचीही एन्ट्री झाल्याची बातमी आहे. या चित्रपटाच्या एका खास गाण्यात सलमान दिसणार आहे, ज्याचे शूटिंग तो लवकरच सुरू करणार आहे.

मला तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवाय: रितेश देशमुख
वृत्तानुसार, सलमान सध्या हैदराबादमध्ये ‘भाईजान’चे शूटिंग करत आहे, मात्र गाण्याच्या शूटिंगसाठी तो काही काळासाठी मुंबईत परतणार आहे. या प्रोजेक्टबद्दल रितेश एका मुलाखतीत म्हणाला, “20 वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर, मी पहिल्यांदाच कॅमे-यामागे उभे राहण्यासाठी मोठी झेप घेत आहे. मी माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत आहे. मला तुम्हा सर्वांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे आहेत. या प्रवासाचा एक भाग व्हा, या वेडेपणाचा एक भाग व्हा,” असे रितेशने म्हटले.

अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट करण्याची माझी इच्छा होती: जिनिलिया
जिनिलिया म्हणाली होती की, “अनेक भाषांमधील चित्रपटांचा भाग बनणे आणि सर्वांचे प्रेम आणि आदर मिळणे ही माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात जन्माला आल्याने मराठीत चित्रपट करण्याची अनेक वर्षांपासून माझी इच्छा होती. आणि शेवटी अशी एक स्क्रिप्ट मिळाली… आणि मग हे घडले,” असे जिनिलियाने सांगितले होते.

12 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे ‘वेड’
वेड या चित्रपटातून अभिनेत्री जिनिलिया अनेक वर्षांनंतर पडद्यावर परतत आहे. या चित्रपटात जिनिलियासोबत जिया शंकरही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल संगीत देणार आहेत. हा चित्रपट 12 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply