अरविंद केजरीवालांच्या चौकशीपूर्वीच आणखी एक मंत्री ईडीच्या कचाट्यात

दिल्ली:- दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी समन्स बजावलं. त्यानुसार अरविंद केजरीवाल आज ( २ नोव्हेंबर ) ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत. अशातच दिल्लीतील आणखी एक मंत्री ईडीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी छापा टाकला असून घराची झडती सुरू आहे. त्याचप्रमाणे राजकुमार आनंद यांच्याशी संबंधित ९ ठिकाणांवरही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. छापेमारीचं कारण अद्याप समोर आलं नाही. ईडी अधिकाऱ्यांच्या छापेमारीनंतर राजकुमार आनंद यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.कथित अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आधीपासून तुरुंगात कैद आहेत. अलीकडेच खासदार संजय सिंह यांना ईडीनं अटक केली होती. याप्रकरणात अरविंद केजरीवाल यांनाही ईडीनं समन्स बजावलं आहे. अशातच मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी ईडीनं छापेमारी केल्यानं दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.
ईडी मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करू शकते, अशी भीती आपच्या नेत्या अतिशी यांनी व्यक्त केली होती. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आपल्या प्रमुख नेत्यांना तुरूंगात टाकून पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अतिशी यांनी केला होता.
“केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करता येऊ शकत नाही, हे माहीत असल्यानं भाजपा ‘आप’ला लक्ष्य करण्यासाछी हे डावपेच खेळत आहे. केजरीवालांना अटक झाली, तर तीन त्यांनी सातत्यानं भाजपाविरोधात भूमिका घेत केलेल्या वक्तव्यांमुळे केलेली कारवाई असेल,” असे अतिशी म्हणाल्या.

Leave a Reply