आवाहन:भाजप नेत्या पंकजा मुंडेंची तलवार म्यान

भाजप नेत्या पंकजा मुंडेंची तलवार म्यान; म्हणाल्या, कार्यकर्त्यांना अडचणीत आणून मला काही मिळवायचे नाही

पाथर्डी:-राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी डावललेल्या भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली तलवार म्यान केली आहे. माझ्यामुळे कुणी आमदार, खासदार, मंत्री झालेच, तर मला आनंदच आहे. तुम्हाला रस्त्यावर उतरवून पदे मिळवण्याएवढी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. कार्यकर्त्यांना अडचणीत आणून मला काहीही मिळवायचे नाही. विश्वास ठेवा, संयम बाळगा, असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे.

विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या निवडक समर्थकांनी राज्यात उद्रेक करत भाजप मंत्र्याच्या गाड्या अडवल्या, कुणी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत भाजप पक्षनेतृत्वाविरुद्ध अप्रत्यक्षपणे भावना व्यक्त केल्या. तरीही याबाबत पंकजा मुंडे यांनी मौन बाळगले होते. यानंतर मंगळवारी बदललेल्या सत्ता समीकरणानंतर पंकजा मुंडे यांनी संयम राखणे पसंत केले आहे.

कार्यकर्त्यांचा संताप शांत करण्यासाठी भेटीचे आयोजन
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा वारसा घेऊन आपण सक्रिय आहोत. आपला संयम एवढा लेचापेचा नाही. एका कारणाने डगमगून जाणार नाही. मात्र, राज्यभरातील लोकांच्या मनात जो संताप भरला तो काढून टाकून जे बोलायचे ते स्पष्टपणे बोलून कार्यकर्त्यांची क्षमा मागावी, यासाठी एकत्रित भेटलो आहोत, असे पंकजा म्हणाल्या.

Leave a Reply