एनव्हीसीसी’चे अध्यक्ष अश्विन प्रकाश मेहाडिया यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर:-विदर्भातील 13 लाख व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना असलेल्या नाग विदर्भ चेम्बर ऑफ काॅमर्सचे अध्यक्ष अश्विन प्रकाश मेहाडिया यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यां विरोधात अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. 17 डिसेंबर रोजी आयोजित आमसभेत अश्लील शिवीगाळ करून धमकावण्याच्या आरोपाखाली भादंवि कलम 294, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. माजी अध्यक्ष दीपने अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मेहाडीया यांच्यासह राजवंत पालसिंह तुली (गोल्डी), आनंद अग्रवाल तसेच महेशकुमार कुकरेजा यांचा समावेश आहे.
सोमवारीच एनसीएलटीने एनव्हीसीसीची कार्यकारिणी बरखास्त करीत प्रशासक नियुक्तीचा आदेश दिला, हे विशेष. या निर्णयामुळे झालेली खळबळ शांत होण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने वादळ निर्माण झाले आहे. शनिवारी 17 डिसेंबर रोजी झालेली आमसभा तसेच निवडणूकीवरून आजी व माजी पदाधिकाऱ्यांत चांगलाच संघर्ष उफाळून आला होता. विद्यमान अध्यक्ष अश्विन प्रकाश मेहाडीया यांच्यासह विद्यमान कार्यकारिणीच दुसऱ्यांदा निवडून आली.
या आमसभेचे रेकाॅर्डींग करता यावे म्हणून माजी अध्यक्ष दीपने अग्रवाल यांनी मुकेश सगलानी व त्यांच्या चमूला बोलावले होते. रेकाॅर्डींग सुरू झाल्यावर अश्विन मेहाडीया यांनी शिवीगाळ करून धमकावले आणि रेकाॅर्डीग बंद पाडले अशी तक्रार दीपेन अग्रवाल यांनी दिली होती. अग्रवाल यांचे सहकारी गिरीश लिलडीया यांना रजिस्टरवर सहीही करू नाही दिली. मेहाडीया व त्यांचे सहकारी दडपशाही करत होते असा आरोपही दीपेन अग्रवाल यांनी केला हाेता.विद्यमान अध्यक्ष अश्विन प्रकाश मेहाडीया यांच्या एककल्ली कारभारा विरोधात माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वात अकरा माजी अध्यक्षांनी सोमवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी हल्लाबोल आंदोलनही केले होते. मागील काही दिवसांपासून एनव्हीसीसीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. 17 डिसेंबर रोजी आमसभा व निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष मेहाडीया यांनी घाईगडबडीत काही मिनिटात आमसभा आटोपली. माजी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे काहीही ऐकून घेण्यात न आल्यामुळे ते बहिष्कार टाकून बाहेर पडले होते.

Leave a Reply