एफआयएमएच्या कायदेशीर नोटीसला रामदेव बाबांचे उत्तर, अ‌ॅलोपॅथीसंदर्भातील विधान नाकारले

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (एफआयएमए) बजावलेल्या कायदेशीर नोटीसला रामदेव बाबा यांनी उत्तर दिले आहे. यात त्यांनी अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांबद्दल केलेले आपत्तिजनक विधान नाकारले आहे.

नवी दिल्ली - योगगुरु रामदेव बाबा यांनी अ‌ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (एफआयएमए) बजावलेल्या कायदेशीर नोटीसाला रामदेव बाबा यांनी उत्तर दिले आहे. यात त्यांनी अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांबद्दल केलेले आपत्तिजनक विधान नाकारले आहे.

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (एफआयएमए) उपाध्यक्ष डॉ रोहन कृष्णन यांनी 22 मेला रामदेव बाबा यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. रामदेव बाबांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. यावर आज रामदेव बाबांनी उत्तर दिले. या नोटीसमध्ये रामदेव बाबा यांनी डॉक्टरांची माफी मागितली नाही. तसेच अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांबद्दल केलेले आपत्तिजनक विधान नाकारले आहे.

रामदेव बाबा यांच्या उत्तरानंतर आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. माफी मागून रामदेव बाबा संपूर्ण वाद मिटवू शकत होते. मात्र, अहंकारापोटी त्यांनी तसे केले नाही, असे डॉ रोहन कृष्णन म्हणाले.

रामदेव बाबा यांचे वादग्रस्त विधान -
रामदेव बाबा यांनी अ‌ॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अ‌ॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. कोरोनावर उपचारामध्ये हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अ‌ॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अ‌ॅलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अ‌ॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे, असे ते म्हणाले होते.

यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी टि्वट करत आयएमएला 25 प्रश्न विचारले होते. त्यानंतर वाद आणखी वाढला. आयएमएने रामदेव बाबांवर थेट देशद्रोहाचा खटला दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली. दुसरीकडे आयएमएच्या उत्तराखंड शाखेने रामदेव बाबाविरोधात 1 हजार कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply