ऑक्सिजन कन्स्ट्रेटर मशीनचा पुरवठा महाराष्ट्र सरकारने रोखला- शिवराज सिंह चौहान यांचा आरोप

मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातील कंपन्यांना ऑक्सिजन कन्स्ट्रेटर मशीन पुरविण्यासाठी ऑर्डर दिली आहे. मात्र, मशिनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मध्य प्रदेशमध्ये पुरवठा न करू देता पहिल्यांदा महाराष्ट्राची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दबाव निर्माण केल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

भोपाळ- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारमध्ये ऑक्सिजनवरून वाद होत आहे. ऑक्सिजन कन्स्ट्रेटर मशीन हे मध्य प्रदेशमध्ये येण्यापासून महाराष्ट्र सरकार रोखत असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. हा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी फेटाळून लावला आहे.
मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील कंपन्यांना ऑक्सिजन कन्स्ट्रेटर मशीन पुरविण्यासाठी ऑर्डर दिली आहे. मात्र, मशिनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मध्य प्रदेशमध्ये पुरवठा न करू देता पहिल्यांदा महाराष्ट्राची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दबाव निर्माण केल्याचा आरोप मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आम्ही असले पाप करत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आपात्कालीन स्थितीत मशीनची मध्य प्रदेश सरकारकडून मागणी
मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले, की राज्यात 2 हजार ऑक्सिजन कन्स्ट्रेटर मशीनची पहिली खेप आली आहे. तर दुसऱ्या खेपेत 650 मशीन येणार आहे. याव्यतिरिक्त जिल्हापातळीवर सुमारे 1300 मशीनची खरेदी करण्यात आली आहे. या मशिन मध्य प्रदेशमधील आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहेत.
1 लाख रेमडेसिवीरची मध्यप्रदेशकडून ऑर्डर
मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी कोरोना आढावा बैठकीत सांगितले, की राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता होऊ दिली जाणार नाही. 1 लाख रेमडेसिवीरची ऑर्डर देण्यात आली आहे. हे इंजेक्शन राज्याला लवकरच मिळणार आहेत. तर राज्यात 42 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.
जगा आणि जगा जगू द्या, हे महाराष्ट्र सरकारचे तत्व
मध्य प्रदेश सरकारने ऑक्सिजन कन्स्ट्रेटर मशिनचा पुरवठा रोखल्याच्या आरोपाला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, की आमचे सरकार जगा आणि जगू द्या या तत्वावर काम करत आहे. महाराष्ट्राला हक्काच्या गोष्टी मिळत नाही. तर अशा स्थितीत आम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी कशा हिसकावू, असा खासदार सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला.
महाराष्ट्र सरकारकडून ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू-
महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत. याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.

Leave a Reply