‘औरंगाबादचे नाव बदलून उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांप्रमाणे हिंदू-मुस्लिम वाद लावू नये’

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा विषय पुन्हा जोर धरू लागला आहे. या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नामांतर न करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई - औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेस, आरपीआयनंतर आता समाजवादी पक्षानेही विरोध केला आहे. औरंगाबादचे नाव बदलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम वाद लावू नये असे, आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. नाव बदलायचे असल्यास रायगडाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे व महाराष्ट्राचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र’ करण्याची मागणी आझमी यांनी केली आहे.

काय म्हणाले आझमी –

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत अबू आझमी यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्याद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. ‘औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचे नाव बदलणे योग्य नाही. नाव बदलून विकास होणार नाही. शहरांची नावे बदलून कुणाचे पोटही भरत नाही. शहरांना आवडीची नाव द्यायची असतील तर, नवी शहरे वसवून त्यांना नावे द्या. अहमदनगर म्हणा किंवा औरंगाबाद, या शहरांना एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीने नामांतर योग्य नाही. नामांतर करायचेच असेल तर आधी महाराष्ट्र राज्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. रायगडचे नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणे हे आपल्याला शोभत नाही,’ असे आझमी यांनी म्हटले आहे. ‘महाराष्ट्रात देशभरातून, जगभरातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढे घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचे कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचे काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ असेही आझमी यांनी म्हटले आहे.

काय आहे वाद –

औरंगाबाद जिल्ह्याचे आणि शहराचे नाव औरंगजेबाच्या नावाने असल्याने हे नाव संभाजीनगर ठेवावे, अशी मागणी केली जात आहे. गेल्या तीन दशकांपासून नाव बदल करावा, अशी मागणी केली जात आहे. गेल्या तीन दशकात हे नाव बदलण्यात आलेले नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून त्यामधील शिवसेनेने संभाजीनगर नाव करण्यास पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाव बदलण्यास पाठिंबा दिला आहे. मात्र, आघाडीमधील काँग्रेसने नाव बदलण्यास विरोध दर्शवला आहे. नाव बदलून विकास होत नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने हा मुद्दा पुढे केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करताना सरकारला आणि विशेष करून शिवसेनेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

आरपीआयची वादात उडी –

राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये नामांतरावरून वाद सुरू आहे. त्यात आता आरपीआयने उडी मारली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबाद हे नाव जुने आहे. हे नाव बदलू नये. नाव बदलल्यास आरपीआय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply