किरकोळ अपवाद वगळता राज्यातील ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान; 18 जानेवारीला मतमोजणी

राज्यात एकूण १४२३४ ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा ११ डिसेंबरला करण्यात आली होती. त्यावेळी १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर काही निवडणुका बिनविरोध झाल्या. तर इतर ठिकाणी किरकोळ अपवाद वगळता सुरळीत मतदान पार पडले.

मुंबई – राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान झाले. या निवडणुकीत राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व ३४ जिल्ह्यात निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यात एकूण १४२३४ ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा ११ डिसेंबरला करण्यात आली होती. त्यावेळी १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर काही निवडणुका बिनविरोध झाल्या. तर इतर ठिकाणी किरकोळ अपवाद वगळता सुरळीत मतदान पार पडले. आज एकूण १२७७६ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच या निवडणुकीमध्ये सरासरी ७९ टक्के मतदान झाले.

उत्तर महाराष्ट्र विभागातील ग्रामपंचायत निवडणूक परिस्थिती -

उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्व चौदा तालुक्यातील एकूण ७०५ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. आयोगाने ७६७ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली होती. तर जिल्ह्यात ५३ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. नाशिक जिल्ह्यातील 565 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. जिल्ह्यात एकूण 4 हजार 299 जागांसाठी प्रत्यक्षात मतदान झालं. त्यासाठी 11 हजार 56 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. धुळे जिल्ह्यात 218 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील 36 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 182 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 87 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. तेवीस ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. एका ग्रामपंचायतीची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे 64 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले.

विदर्भातील ग्रामपंचायत निवडणूक परिस्थिती -

विदर्भात नागपूर जिल्ह्यात १३० पैकी १२७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आदासा आणि सावनेर तालुक्यातील जटा मखोरा ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाली आहे. या सोबतकुही तालुक्यातील देवळीकला ग्रामपंचायत निवडणूक मतदान यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली,

अकोला जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायतीचे मतदान झाले. अमरावती जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. एकूण निवडणूक जाहीर झालेल्या ५५३ पैकी १३ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या. यंदा निवडणुकीत सर्वच मोठ्या पक्षांनी त्यांचे उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे मतदारांचा नेमका कौल कोणाला मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. भंडारा जिल्ह्याच्या 148 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. या जिल्ह्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. बुलडाणा – जिल्ह्यात एकूण 527 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. मात्र 29 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्यामुळे 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. चंद्रपूर जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात 170 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात. गोंदिया जिल्ह्यात १८९ ग्रामपंचयतीसाठी मतदान झालं. नक्षलग्रस्थ भागातील मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वर्धा जिल्ह्यात 50 ग्रामपंचायत निवडणुकासाठी मतदान झाले. जिल्ह्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. वाशिम जिल्ह्यात एकूण 163 ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर उर्वरित 152 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यात आज 925 ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक झाली.

मराठवाड्यातील ग्रामपंचायत निवडणूक परिस्थिती -

मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ५८२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झालं. जिल्ह्यातल्या ६१७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापुर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात 422 ग्रामपंचायतिची निवडणूक पार पडली. जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या ५ हजार १५४ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात 408 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी 25 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या असल्याने 383 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. नांदेड जिल्ह्यात १०१३ ग्रामपंचायतींसाठी मतदान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी १०६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात. राहिलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज मतदान झाले. परभणी जिल्ह्यातील 566 पैकी 68 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे उर्वरीत 498 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली. जालना जिल्ह्यात 446 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने त्यासाठी आज मतदान झाले. जिल्ह्यात 28 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 40 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज 388 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक परिस्थिती -

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. यामध्ये 2010 प्रभागातील 5 हजार 33 जागांसाठी 11 हजार ७ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. तर जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात 386 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तर जिल्ह्यात 47 ग्रामपंचायतींनी यापूर्वीच बिनविरोध निवडणुकीची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे 143 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सातारा जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. दुपारपर्यंत सुमारे ४४ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर ३ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नाहीत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये ६५८ ठिकाणी निवडणूक लागली होती. जिल्ह्यात १ ठिकाणी निवडणूक रद्द झाली तर ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज 590 ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.

कोकण विभागातील ग्रामपंचायत निवडणूक परिस्थिती -

कोकणात रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान झालं. जिल्ह्यात 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आलं. तर रत्नागिरी जिल्ह्यात ३६० ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ६६ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. दुपारपर्यंत ५२ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात एकूण ७० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ६६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ४९४ जागांसाठी १०८७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ठाणे जिल्ह्यात १४३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. जिल्ह्यात कल्याण ग्रामीणमधील आणे-भिसोळ ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीच्या वेशीवर असणाऱ्या वाघेरापाडा स्मशानभूमीत निवडणूकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची हाताने नावे लिहिलेला कागद कणकेच्या गोळ्यात खोचलेला आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पालघर जिल्ह्यात सागावे, पाली, सत्पाळा या तीन ग्रामपंचायतची निवडणूक आज झाली.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान

राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या. त्यापैकी राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.

दुपारी 3.30 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 66 टक्के मतदान

निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती – 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,776
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध होणारे उमेदवार- 26,718
निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

Leave a Reply