कुंभमेळ्यातून आलेल्यांना १४ दिवस सक्तीचे गृह विलगीकरण; दिल्ली सरकारचा निर्णय

४ ते १७ एप्रिलदरम्यान दिल्लीच्या ज्या नागरिकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली होती, त्यांनी स्वतःची माहिती सरकारला द्यायची आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या एका लिंकवर ही माहिती भरता येणार आहे. यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आल्याचेही देव यांनी स्पष्ट केले. तर, १८ ते ३० एप्रिलपर्यंत कुंभला जाणाऱ्या लोकांनी जाण्यापूर्वीच आपली माहिती देऊन जायचे आहे.

नवी दिल्ली : कुंभ मेळ्यातून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृहविलगीकरणात ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. शहरातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असे न करणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी दिली.
४ ते १७ एप्रिलदरम्यान दिल्लीच्या ज्या नागरिकांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली होती, त्यांनी स्वतःची माहिती सरकारला द्यायची आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या एका लिंकवर ही माहिती भरता येणार आहे. यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आल्याचेही देव यांनी स्पष्ट केले. तर, १८ ते ३० एप्रिलपर्यंत कुंभला जाणाऱ्या लोकांनी जाण्यापूर्वीच आपली माहिती देऊन जायचे आहे. यामुळे कुंभहून आलेल्या लोकांचा अधिक प्रभावीपणे शोध घेऊन, त्यांच्यावर लक्ष ठेवता येणार आहे.

कुंभमधील भाविक ठरु शकतात सुपर स्प्रेडर..
जर कोणी अशी माहिती दिली नाही, आणि कुंभहून परतल्याचे आढळले तर त्याला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये दोन आठवड्यांसाठी पाठवण्यात येईल, असेही देव यांनी सांगितले. आतापर्यंत कुंभ मेळ्यामध्ये दोन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे याठिकाणहून येणारे भाविक हे सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

किशोरी पेडणेकरांचीही अशीच भूमीका..
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही कुंभमधून शहरात परतलेल्यांना विलगीकरणात ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे शनिवारी सांगितले होते. तसेच, देशातील इतर राज्यांनीही असाच निर्णय घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

Leave a Reply