कुळावरून केलेली टीका बावनकुळेंना झोंबली:म्हणाले, माझे वडील शेतकरी

नागपूर:-शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांच्या कुळावरून केलेली टीका बावनकुळे यांना चांगलीच झोंबली आहे. माझे वडील शेतकरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र नेटकऱ्यांनी साहेब, आपल्या 7 पिढ्या बसून खातील असे म्हणत त्यांचीच खिल्ली उडवली आहे.
बावनकुळे यांनी एक ट्विट करून महापालिका निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे. दोघातील हा वाद कोणते वळण घेतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केला. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवला आहे.
उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असे आणखी एक ट्विट बावनकुळे यांनी केले आहे.
या दोन्ही ट्विटवर भाजप तसेच बावनकुळे समर्थकांनी ठाकरे यांना झोडून काढले आहे. मात्र, बावनकुळे यांना खडे बोल सुनावणारे शेरेही लक्षवेधी ठरत आहे. अनेकांनी बावनकुळे यांना चांगलेच चिमटे काढले आहे. ‘साहेब आपल्याकडे आज इतकी संपत्ती आहे की आपल्या 7 पिढ्या बसून खातील. आणि आपण म्हणताय मी गरीब! खरोखर गरिबीत दिवस काढलेल्या तुमच्या पूर्वजांचा तो अपमान आहे, असे काहीही बोलत जाऊ नका हो सर’ अशी खोचक टिप्पणी दिनेश नवले यांनी लिहिली आहे.

Leave a Reply