चक्रीवादळ, अवकाळी पाऊस… पंतप्रधान मोदींनी घेतला आढावा, किनारी भागांना सतर्कतेचा इशारा

गेल्या दोन दिवसांत देशभरात सर्वत्र हवामान बदलले आहे आणि विविध भागांमध्ये सतत पाऊस, वादळी वारे, काही भागात बर्फवृष्टी अशी परिस्थिती आणि तापमानात घट झाली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची तीव्रता 3 डिसेंबरपर्यंत वाढू शकते, असा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी भारतातील सद्य हवामान परिस्थिती, पाऊस आणि चक्रीवादळाचा इशारा यावर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळाच्या (Rains due to Jawad Cyclone in India) पार्श्वभूमीवर देशातील वादळी पावसाशी संबंधित परिस्थिती व तयारीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांना रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात सर्वत्र हवामान बदलले आहे आणि विविध भागांमध्ये सतत पाऊस, वादळी वारे, काही भागात बर्फवृष्टी अशी परिस्थिती आणि तापमानात घट झाली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची तीव्रता 3 डिसेंबरपर्यंत वाढू शकते, असा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. चक्रीवादळाचा जास्त परिणाम आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयनगरम जिल्ह्यांवर आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, किनारपट्टी भागात ‘वादळी वाऱ्यांसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस’ पडण्याची शक्यता आहे.

कालपासून उत्तर भारत आणि पश्चिम भारतात वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे हवामानात कमालीचा बदल झाला आहे. याशिवाय दक्षिण भारतात तर गेल्या महिन्यापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे.

NDRF टीम्स सज्ज
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बुधवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (NCMC) बैठक घेतली आणि चक्रीवादळापूर्वी केंद्रीय मंत्रालये आणि एजन्सींच्या तयारीचा आढावा घेतला. गौबा यांनी निर्देश दिले की मच्छीमार आणि समुद्रातील सर्व जहाजे ताबडतोब परत बोलावण्यात याव्यात आणि चक्रीवादळाचा फटका बसू शकणार्‍या भागातील लोकांना खबरदारी म्हणून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे.

IMD (Indian Meteriological department) ने ‘मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा’ अलर्ट देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषत: ओडिशा आणि आंद्रप्रदेशमध्ये जारी केला आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) ने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 32 टीम्स तैनात केल्या आहेत आणि अतिरिक्त टीम देखील स्टँडबायवर ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा निर्माण झाल्यास, लष्कर आणि नौदलही जहाजे आणि विमानांसह सज्ज आहेत.

Leave a Reply