चिकन नको रे बाबा.. मटण प्लेट लाव.. बर्ड फ्ल्यूमुळे चिकन विक्रेते, सावजी भोजनालयांना फटका

गेल्या वर्षभरात कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडण्याची सोय नसल्याने आणि सर्व दुकाने आणि हॉटेल्स बंद असल्याने अस्सल खवय्ये हॉटेल्सच्या पदार्थांची चवच विसरले होते. आता कुठे हॉटेल चालू झाली असताना बर्ड फ्ल्यूची संक्रांत आली आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या बर्डफ्ल्यूने मांसाहारावर विपरीत परिणाम केल्याची कटू आठवण सावजी भोजनालयवाले आजवर विसरलेले नाहीत. त्यामुळे यंदा आलेले संकट किती दिवस कायम राहते, याबद्दल त्यांच्या मनामध्ये भीतीही आहे. तसेच, खवय्येही अस्वस्थ झाले आहेत.

नागपूर - गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे प्रत्येकाला घरात कोंडून घ्यावं लागलं होतं. कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडण्याची सोय नसल्याने आणि सर्व दुकाने आणि हॉटेल्स बंद असल्याने अस्सल खवय्ये हॉटेल्सच्या पदार्थांची चवच विसरले होते. अनलॉक सुरू झाल्यानंतर आता हॉटेल्स पुन्हा सुरू झाली आहेत. आता कुठे नागपुरातील जगप्रसिद्ध सावजी हॉटेल्स पुन्हा मांसाहार प्रेमींच्या गर्दीने फुलायला सुरवात झाली होती. त्यातच आता बर्ड फ्ल्यूचा धोका निर्माण झाल्याने पुन्हा सावजी हॉटेल्समधील गर्दी कमी होऊ लागली आहे.

ही परिस्थिती केवळ हॉटल्सपुरती मर्यादित नसून चिकनच्या दुकानातील खप देखील ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. बर्ड फ्ल्यूमुळे चिकन खाण्यावर निर्बंध आले असले तरी मांसाहार प्रेमींनी आपल्या मोर्चा मटण आणि मासोळीकडे वळवला आहे. त्यामुळे नागपुरात बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स आणि चिकनच्या दुकानांमध्ये काय परिस्थिती आहे आणि मांसाहारप्रेमी यावर काय उपाय करताहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सावजी भोजनालयवाले आणि खवय्ये अस्वस्थ

काही वर्षांपूर्वी आलेल्या बर्डफ्ल्यूने तीन महिने मांसाहारावर विपरीत परिणाम केल्याची कटू आठवण सावजी भोजनालयवाले आजवर विसरलेले नाहीत. त्यामुळे यंदा आलेले संकट किती दिवस कायम राहते, याबद्दल त्यांच्या मनामध्ये भीतीही आहे. दरम्यान, सावजी जेवणामध्ये चिकन, मटण खूप वेळ शिजवले जाते. उच्च तापमानामध्ये आणि तीव्र मसाल्यांमध्ये शिजवल्यामुळे त्यात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही, अशी समजूत सावजी भोजनालयवाले घालत आहेत. मात्र, त्याचा फारसा परिणाम सध्या तरी मांसाहार करणाऱ्या खवय्यांवर होत नाहीये. यामुळे सावजी भोजनालये ओस पडलेली दिसून येत आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ आणि आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बर्ड फ्ल्यूची लागण झालेल्या पक्षांची बातमी आली आणि खाद्यप्रेमी विशेषतः मांसाहार करणाऱ्या खवय्यांच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. आता कुठे चिकनची चव तोंडाला लागली असताना मन तृप्त होण्यापूर्वीच बर्ड फ्ल्यूचा धोका उद्भवल्याने पुन्हा आपल्या मनाला आवर घालावी लागणार, या विचारानेच अनेकजण अस्वस्थ झाले आहेत.

Leave a Reply