जम्मू काश्मीर : चकमकीत सुरक्षा दलातील जवानांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील खुलचोहर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून कंठस्नान घालण्यात आले.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील खुलचोहर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या परिसरात संयुक्तपणे शोधमोहीम सुरू आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांकडून चेवा उल्लार या गावात दहशतवादी असल्याचा संशय सुरक्षा दलाकडे व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर या कारवाईत १ एके रायफल आणि २ पिस्तुल हस्तगत करण्यात आल्या आहेत.दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून परिसरात आणखी काही दहशतवादी आहेत का? याचा शोध सुरक्षा दल व पोलिसांकडून घेतला जात आहे. यापूर्वी शुक्रवारी (26 जून) सुरक्षा दल व दहशतवाद्यांच्यात त्राळमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.

Leave a Reply