
पुणे :- वडगाव शेरी परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तरुणाच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. वैमनस्यातून तरुणाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.अभिषेक राठोड (वय ३१) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक बुधवारी (१ नोव्हेंबर) रात्री वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटीत परिसरातून निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला अडवले. राठोड याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.राठोडला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राठोड याचा खून वैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.