तिरुपतीत 80 दिवसांनी दर्शन, रोज 200 जणांची कोरोना टेस्ट, मंदिरात प्रसाद, फुले नेण्यावर बंदी

दक्षिण भारतातील मोठ्या मंंदिरांचे द्वार आज उघडणार

नवी दिल्ली:-. सुमारे ८० दिवसांच्या लॉकडाऊननंतर तिरुपती-तिरुमला येथे श्री व्यंकटेश्वराचे दर्शन सोमवारपासून सुरू होत आहे. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत दर्शन सुरू राहील. या काळात दर तासाला ५०० भाविकांना दर्शन घेता येईल.

तिरुपती-तिरुमला देवस्थानम ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितले की, सुरुवातीचे तीन दिवस दर्शनाची ट्रायल होईल, ज्यात मंदिराचे सुमारे २१ हजार पुजारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईक आणि तिरुपतीचे स्थानिक लोक दर्शन घेतील. ६५ वर्षांवरील व्यक्ती व १० वर्षांखालील मुले यांना सध्या दर्शनाची परवानगी मिळणार नाही. भितींना स्पर्श न करणे तसेच ग्रील न पकडता चालण्याची सूचना भाविकांना करण्यात आली आहे.

दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणीच्या आधारे टाइम स्लॉट घ्यावा लागेल. ११ जूनपासून सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू होईल. कल्याणकट्ट्यावर भाविकांना केशदान करता येईल. तेथे दोन नाभिकांत १० फुटांचे अंतर राहील. अन्नदानम हॉलमध्येही एक हजारऐवजी २०० जणांना प्रवेश मिळेल.

मंदिरात फुलांचे हार किंवा अर्पण करण्यासाठी वस्तू नेण्यास परवानगी नसेल. चरणामृत (तीर्थम) आणि प्रसादरूपी मिळणारे छोटे लाडूही मिळणार नाहीत. भाविकांच्या डोक्यावर सतारी (आशीर्वादाचा टोप) ही ठेवली जाणार नाही. दंडवत करणे आणि परिसरात बसण्यास बंदी राहील.

केरळ : मंदिर प्रवेशापूर्वी कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आंध्र प्रदेशातील श्रीशैलमचे मल्लिकार्जुन मंदिर आणि विजयवाडाचे कनकदुर्गा मंदिरही सोमवारपासून सुरू होत आहे. केरळातील तिरुवनंतपुरमचे पद्मनाभ मंदिर मंगळवारी सुरू होईल. रोज ७५० जणांना दर्शनासाठी ऑनलाइन स्पॉट ऑफलाइन (ऑनलाइनच्या शिल्लक) नोंदणी तिकीट घ्यावे लागेल. सबरीमाला मंदिर १४ जून ते १९ जूनपर्यंत सुरू होईल. रोज २०० जणांना दर्शन मिळेल. पद्मा नदीत स्नान करता येणार नाही. केरळात मंदिर प्रवेशापूर्वी भाविकांना आपण कोविडमुक्त असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

Leave a Reply