दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण ; छत्तीसगडच्या महिला नक्षलीचाही समावेश

राज्य व केंद्रशासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी हिंसक कारवाया सोडून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत.

गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर ( २६, रा.तिम्मा जवेली, ता. एटापल्ली), रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो (३०, रा. डांडीमरका, जि. नारायणपूर, छत्तीसगड), असे आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत.राज्य व केंद्रशासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी हिंसक कारवाया सोडून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. नक्षल्यांच्या विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी एका महिलेसह दोन नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी अनिल हा २००९ साली कसनसूर दलममध्ये सहभागी झाला होता. २०१२ पर्यंत तो सक्रिय दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर २०२२ पर्यंत त्याने गावात राहून नक्षली कारवाया पार पाडल्या. या दरम्यान तो खोब्रामेंढा, निहाकल आणि झोलीया जंगलात झालेल्या चकमकीतही सहभागी होता. त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. रोशनी ही छत्तीसगड राज्यातील आरेच्छा येथील रहिवासी असून ती २००९ साली जटपूर दलममध्ये सहभागी झाली होती. ती २०१५ पर्यंत नक्षल्यांच्या तांत्रिक विभागात कार्यरत होती. त्यानंतर २०१८ पर्यंत उपकमांडर पदावर सक्रिय होती. २०१८ ते २०२२ दरम्यान तिने गावात राहून काम केले. तिचा छत्तीसगड येथील कुंदला, गुंडूपार आणि दूरवडा चकमकीत सहभाग होता. २०१५ साली तिने भामरागड तालुक्यातील इरपनार येथील ३ नागरिकांची हत्यादेखील केली होती. तिच्यावर एकूण २ लाखांचे बक्षीस होते. गेल्या काही काळापासून नक्षल चळवळीमध्ये होत असलेल्या मुस्कटदाबीमुळे अनेक नक्षलवादी अस्वस्थ असून ते आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत आहे. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना केंद्र व राज्यशासनाच्या योजनेंतर्गत सर्व लाभ दिल्या जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रपरिषदेत दिली. २०१९ ते २०२२ दरम्यान ५१ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Leave a Reply