नवदुर्गांचे दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोन तरुण ठार, एक जखमी

यवतमाळ येथील नवदुर्गांचे दर्शन घेऊन धामणगावकडे परत येताना विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनासोबत झालेल्या धडकेत दुचाकीस्वारासह एकाचा मृत्यू झाला

अमरावती : यवतमाळ येथील नवदुर्गांचे दर्शन घेऊन धामणगावकडे परत येताना विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनासोबत झालेल्या धडकेत दुचाकीस्वारासह एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी यवतमाळ-धामणगाव मार्गावर नांदुऱ्याजवळ घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. मयुर शंकरराव नेवारे (२६) व प्रणय वानखडे (२५) अशी मृतांची, तर रुद्र अतुल राऊत (१५) असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून ते तिघेही धामणगाव येथील अमर शहीद भगतसिंग चौक परिसरातील रहिवासी आहेत. यवतमाळ येथील नवदुर्गा उत्सव पाहण्याकरिता हजारो भाविकांची रीघ लागली आहे. देवीच्या दर्शनासाठी मृतक मयुर, प्रणय व जखमी रुद्र हे तिघे दुचाकीने शनिवारी (दि. १) रात्री यवतमाळ येथे गेले होते. दरम्यान, रविवारी सकाळी ते धामणगाव रेल्वेकडे परत येत असताना यवतमाळ-धामणगाव मार्गावर नांदुरानजीक विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनाने मयुर नेवारे याच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत मयुरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा पूर्णतः चक्काचूर झाला. अपघातातील गंभीर जखमी प्रणय वानखडे याला उपचाराकरिता सेवाग्राम येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमी रुद्र राऊत याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाभुळगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. यवतमाळ-धामणगाव रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर सुसाट वाहन चालविणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली. याच यवतमाळ-धामणगाव मार्गावर दोन दिवसांपूर्वी मालवाहू आणि दुचाकीच्या अपघातात सावळा येथील दोन युवकांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply