नवले पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला

पुणे:-पुण्यातील नवले पुलाजवळ अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. येथील भूमकर पूल येथे सातारा येथून पुण्याकडे येणाऱ्या एक पीकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी ट्रकला धडकून पलटी झाली. यात ७ जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास घडली.नवले ब्रिज येथे गेल्या आठवड्यात तब्बल ४७ वाहने एकमेकांना धडकुन भीषण अपघात झाला होता. यात तब्बल २० जण जखमी झाले होते. त्याच दिवशी या पूलाजवळच एका ट्रकने तब्बल ७ वाहनांना उडवले होते. तर, दुसऱ्या दिवशी देखील अपघातात काही वाहनांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री सातारा येथून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या पीकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही पीकअप पलटी झाली. ही घटना नवले पुला जवळील भूमकर चौक येथे घडली. यात गाडीतील ७ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात जखमींना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply