नागपुरातही कोरोनाच्या सावटाखाली विठू नामाचा गजर

प्रत्येक वारकरी आज शरीराने कुठेही असला तरी मनाने पंढरपुरात असून त्या ठिकाणी मिळेल त्या मंदिरात गजरकरून आज आषाढी एकादशी दिनी आपली भक्ती अर्पन करत असल्याची भावना नागपूरच्या विश्व वारकरी सेवा संस्थानचे अध्यक्ष संदीप कोहळे यांनी बोलून दाखविली.

नागपूर - कोरोनामुळे वारीवर निर्बंध आल्याने अनेक वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. लाखोंच्या संख्यने वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाही. परंतु मिळेल त्या ठिकाणी विठूरायाचे दर्शन घेऊन नामस्मरणकरत आहे. नागपूरच्या बेसा येथील स्वामी धाम मंदिराच्या परिसरात एकत्र येत विठू नामाचा गजर करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करत हा गजर करण्यात आला.

‘आम्ही मनाने वारीतच’

कोरोनामुळे वारीवर जरी निर्बंध आले, मंदिरात जाण्यावर निर्बंध असले, तरी मनात असलेल्या भक्तीवर कुठलेच निर्बंध आलेले नाही. त्यावर कोणी निर्बंध घालू शकणार नाही. यामुळे विठूरायांच्या नामाचा स्मरण करण्यास स्वामीधाम मंदिरात वारकऱ्यांनी एकत्र येत हरिपाठ केला. कोरोनामुळे यंदा वारकऱ्यांना वारीला जाता आले नाही. पण आजही त्यांचा भाव मनात असल्याचे ते बोलून दाखवतात. यामुळे प्रत्येक वारकरी आज शरीराने कुठेही असला तरी मनाने पंढरपुरात असून त्या ठिकाणी मिळेल त्या मंदिरात गजरकरून आज आषाढी एकादशी दिनी आपली भक्ती अर्पन करत असल्याची भावना नागपूरच्या विश्व वारकरी सेवा संस्थानचे अध्यक्ष संदीप कोहळे यांनी बोलून दाखविली.

‘ही आनंदाची वारी’

‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ परब्रह्म’ या ओळी प्रमाणे अंतःकरणातून विठूरायाची सेवा केली तर विठ्ठल भेटतो. यामुळे जरी वारीला जाऊ शकलो नाही, तरी आजही आम्हाला आमच्या विठूरायाचे दर्शन झाले, असेही वारकरी कवडूजी नांदेकर यांनी सांगितले. यावेळी वारकरी विश्व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामीधाम मंदिरात येऊन आम्ही हरिपाठ करू शकलो, याचा आनंद असल्याचे सांगितले. अंत:करणात देव असेल तरच देव, नाही तर पंढरपुरात गेले तरी देव मिळत नाही. त्यामुळे यंदा पंढरपुरात जाऊ शकलो नाही तरी इथूनच विठूरायाचे दर्शन घेत आषाढी एकादशी निमित्त हरिपाठ करत आपली भक्ती अर्पण केल्याचा आनंद वारकरी आणि विठ्ठल भक्ताने व्यक्त केला आहे.

Leave a Reply