नागपुरात वनविभागाची कारवाई:वन्यजीव अवयवांची तस्करी करणाऱ्याला अटक

वन्यजीव अवयवांची तस्करी करणाऱ्याला अटक; अघोरी तंत्र आणि शुभशकून म्हणून करीत होते उपयोग

नागपूर:-नागपूरमध्ये मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने सापळा रचून वन्यजीव अवयवांची तस्करी करणाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले अवयव तपासणीसाठी बुधवारी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

वनविभागाने तयार केलेल्या पथकाने नागपुरातील शिवशंकर एजंसी या दुकानात बनावट ग्राहक पाठवला. तिथे अपेक्षित अवयव मिळताच बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर दबा धरून बसलेल्या पथकाने छापा मारला. तिथून अवयव जप्त केले. तसेच दुकान मालक मयूर मधुसूदन गुप्ता (वय 33) यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घोरपडीच्या अंगाचे अवयव असलेल्या हाताजोडीचे 18 नग, प्रवाळावर पोसणारा किटक सी-फॅन्स व घोरपडीचा प्रकार असलेल्या प्राण्याच्या डोक्याचा वरचा रंगमाही हा भाग जप्त केला आहे.

रंगमाही हा गुप्त धन तसेच अघोरी प्रकारात वापरला जातो. तर प्रवाळावर पोसल्या जाणारा सी-फॅन्स हा किटक घरात शुभशकून म्हणून लावल्या जातो. या प्रकरणाचा तपास अवैध शिकार प्रतिबंधक पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे करीत आहे.

यापूर्वी पकडली होती व्हेलची उलटी

अवैध शिकार प्रतिबंधक पथकाने केलेली ही या आठवड्यातील दुसरी कारवाई आहे. 19 जून रोजी वनविभागाने कोट्यवधी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी अर्थात अंबरग्रीस जप्त केली होती. याप्रकरणी नागपुरात चार तस्करांना वनविभागाने सापळा रचून अटक केली होती.

नागपुरात पकडण्यात आलेल्या अंबरग्रीसची किंमत कोट्यवधी रुपयांची असण्याची शक्यता आहे. अंबरग्रीस प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वनविभागाने सापळा रचून नागपुरात शहरातल्या गणेशपेठ परिसरातून प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले होते.

Leave a Reply