पुणे न्यायालयाचा आदेश:लष्कर ए तोयबाशी संबंधित संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी

लष्कर ए तोयबाशी संबंधित संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी; पोलिस कोठडीचे हक्क ठेवले अबाधित

पुणे:-देशात घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी ‘लष्कर-ए-तोयबा’ दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयाने पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी मंगळवारी सुनावली आहे.

इनामूल हक ऊर्फ इनामूल इम्तियाज (वय १९, रा. पटणा, गिरडीह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. त्याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशातून अटक केली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे तपास करून त्यांची सविस्तर जबाब नोंदविण्याचे काम चालू आहे. अटक आरोपी यांचे सोशल मीडिया अकाउंटला डेटा हा मोठ्या प्रमाणात असून त्याच्या विश्लेषणाचे काम चालू आहे. यासह अटक आरोपी व पाहिजे आरोपी यांच्याविरुध्द आणखी पुरावा शोधले जात आहे. त्यामुळे चार दिवस पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला.

देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी ‘लष्कर-ए-तैयबा’शी संपर्कात असल्याच्या संशयावरून ‘एटीएस’ने दापोडी येथून जुनैद महंमद अता महमंद (वय २८, रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, जि. बुलडाणा) याला गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यानंतर ‘एटीएस’ने काश्मीरमध्ये शोध मोहीम राबवून, २ जून रोजी जुनैदचा साथीदार असल्याच्या संशयावरून आफताब शाहला (वय २८, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) जेरबंद केले. त्यानंतर ‘एटीएस’ने इनामूल हक उर्फ इनामूल इम्तियाज (वय १९, रा. पाटणा, गिरडीह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) आणि महंमद युसूफ महंमद शाबान अत्तू (वय ३१, रा. पोस्ट दलयोग, उधियानपूर, जि. दोडा, जम्मू-काश्मीर) या दोन संशयित तरुणांनाही अटक केली आहे.

Leave a Reply