
पुणे:- पुणे महामेट्रो आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट केला जाणार आहे. यासाठी पुणे मेट्रो आणि महापालिकेकडून मंडई परिसराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरळीत वाहतूक व्यवस्था, पादचाऱ्यांसााठी विना अडथळा मार्गक्रमण, खुल्या रंगमंचाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम, मंडई परिसरातील ऐतिहासिक वास्तूंसाठी हेरिटेज वाॅक, जुन्या मंडईच्या वास्तूच्या बाजूला नवीन भवन, मेट्रो कामांमुळे विस्थापित झालेल्या दुकानांचे पुनर्वसन अशा विविध बाबींचा या आराखड्यात समावेश आहे.मेट्रो आणि महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्याबाबतच्या करारावर महापालिकेकडून आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे मेट्रोतर्फे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यासाठी 11 कोटी 68 लाख रुपये खर्च येणार आहे. पुणे मेट्रो आणि महापालिका तो खर्च करणार आहे.
मंडई परिसरात घेण्यात येणाऱ्या कामांची सूची
1. मंडई मेट्रो स्थानक आणि बुधवार पेठ मेट्रो स्थानक यामुळे या परिसरात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे. त्याअनुषंगाने बस थांबे, ई-रिक्षा, सायकल, दुचाकी, तीन चाकी, चार चाकी पार्किंग यांचा सर्वसमावेशक विचार करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
2. पादचाऱ्यांसाठी पादचारी मार्ग आणि भूमिगत पादचारी मार्ग यांचे योग्य नियोजन करून या परिसरात हेरिटेज वॉक टूरसाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे. या परिसरात असणाऱ्या ऐत्याहासिक वास्तू, तांबट आळी, बुरुड आळी धार्मिक स्थळे, म. फुले मंडई आणि तुळशीबाग या सर्व ठिकाणे सहज पायी चालत जाण्याजोगी आहेत. त्यामुळे ‘सेल्फ गाईडेड ऑडिओ टूर’ सुरु करण्याचे नियोजन आहे.
3. मेट्रो कामांमुळे विस्थापित झालेल्या दुकानांचे मंडईच्या बाजूला नवीन भवन बांधून पुनर्वसन करणे. हे नवीन भवन जुन्या मंडईच्या भवनाला अनुरूप असे असेल. नवीन भवनांचे बाह्यरूप हे मंडईच्या हेरिटेज वास्तूला साम्य असणारे बनविण्यात येणार आहे.
4. तसेच मंडई परिसरात एक टेरेस ओपन एअर थिएटर बांधण्यात येऊन वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी लागणाऱ्या सोयीची पूर्तता करण्यात येईल.
5. मंडईच्या मुख्य वास्तूच्या बाजूला पादचाऱ्यांसाठी ‘स्पेशल बॅरिअर फ्री पेडेस्ट्रीयन झोन’ बनविण्यात येईल. या भागात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अश्या वाहनांना मज्जाव असेल.
महामेट्रो केवळ मेट्रो स्थानकांच्या विकासाव्यतिरिक्त मेट्रो स्थानकांभोवतीच्या परिसराचादेखील विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुणे महानगरपालिका यांच्या सहकाऱ्यामुळे महात्मा फुले मंडई परिसराचा विकासाचा आराखडा करण्यात आला आहे. प्रस्तावित आराखड्यामुळे या परिसराचे रूप पालटणार आहे. संपूर्ण महात्मा फुले मंडई पादचारी स्नेही करण्यात येणार आहे, असं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले .