
पुणे :- पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.दोन्ही संघटनांमध्ये झालेल्या राड्यामुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या संघटनेकडून विद्यापीठात संघटनेी सदस्य नोंदणी सुरू होती. त्यावेळी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. अभाविपने आमच्या सदस्य नोंदणीत अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला.
या हाणामारीत दोन्ही बाजुचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पुणे विद्यापीठातील हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनुसार, एसएफआयच्या कार्यकर्त्याला अभाविपचे कार्यकर्त्यांनी खाली पाडून मारताना दिसत आहेत. तर, एका अभाविपच्या कार्यकर्त्याला एसएफआयचे कार्यकर्ते काठीने मारहाण करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
आज सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ची सभासद नोंदणी सुरू होती. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या गुंडांनी अचानक येऊन एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप संघटनेचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केला आहे.
या हल्ल्यात एसएफआयचे राज्य अध्यक्ष आणि केंद्रीय कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे, गणेश जानकर या कार्यकर्त्यांना मार लागला आहे. इतरही कार्यकर्त्यांना सुद्धा मुका मार लागला आहे. गुंड प्रवृत्तीची अभाविप कायम असे हिंसक कृत्य करत आली आहे. त्यांनी त्यांच्या गुंड संस्कृतीची पुनरावृत्ती केली आहे. काहीही कारण नसताना, शांततेत एसएफआयचा सभासद नोंदणी कार्यक्रम सुरु असताना हा हल्ला केला गेला. अचानक एसएफआयच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली असल्याचे रोहिदास जाधव यांनी म्हटले.
काही वर्षांपूर्वीदेखील एसएफआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. एका आमदाराने भारतीय जवानांच्या पत्नीबाबत काढलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी निषेध करणारी पोस्टर लावली होती. ही पोस्टर लावताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एसएफआयच्या कार्यकर्त्यांना अटकाव करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती.