पूरग्रस्तांना निकषांपेक्षा अधिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात महापूर आणि दरड कोसळून झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूरग्रस्तांना सहा ते सात हजार कोटींचे पॅकेज जाहिर करण्याची शक्यता आहे. आज (बुधवार) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या संबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली येथे पूर आला होता, तेव्हा जे निकष लावण्यात आले होते, त्याच निकषांनुसार पूरग्रस्तांना मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई - राज्यात अतिवृष्टी आणि दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना आयुष्यात पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून मदतीचे पॅकेज बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे. प्रचलित राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषांपेक्षा अधिक मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आज (बुधवार) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

राज्यात अतिवृष्टीमुळे घरे, रस्ते, शेती, व्यवसायिक अस्थापने, दुकानांचे किती नुकसान झाले याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वरिष्ठ मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या वेळी प्रचलित निकषांपेक्षा अधिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजूनही काही भागांत पुराचे पाणी असल्याने पंचनामे झालेले नाहीत. प्राथमिक अहवालाच्या आधारे तसेच २०१९ च्या शासन निर्णयानुसार सुमारे ६ ते ७ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात येणार आहे.

बळींची संख्या २०९ वर पोहोचली
राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीतील बळींची संख्या २०९ वर पोहोचली असून, अजूनही आठ लोक बेपत्ता आहेत. तर ५२ लोक जखमी झाले आहेत. पाऊस आणि महापुराचा १३५१ गावांना फटका बसला असून सुमारे ४ लाख ३४ हजार लोकांचे स्थलांतर झाले आहे. दोन लाख ५१ हजार लोकांची ३०८ निवारा केंद्रात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply