पेट्रोल-डिझेल 14 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता:कच्च्या तेलाच्या किमती 82 डॉलरपर्यंत घसरल्या

नवी दिल्ली:-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जानेवारीपासून आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. त्याचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट 81 डॉलरच्या खाली आणि अमेरिकी क्रूड 74 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ आला आहे. यामुळे यंदा मे नंतर पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर घटण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 14 रुपयाने स्वस्त होऊ शकतात.विशेषत: ब्रेंटच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे भारतीय रिफायनरीसाठी कच्च्या तेलाची सरासरी किंमत (इंडियन बास्केट) कमी होऊन 82 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. मार्चमध्ये ती 112,8 डॉलर बॅरल होती. या हिशेबाने गेल्या 8 महिन्यात रिफायनिंग कंपन्यांसाठी कच्च्या तेलाचे दर सुमारे 31 डॉलर (27.3%) कमी झाले आहेत. एसएमसी ग्लोबलच्या एका अहवालानुसार, क्रुडमध्ये 1 डॉलर बॅरल घट झाल्याने देशाच्या तेल कंपन्यांना रिफायनिंगवर लिटरमागे 45 पैशांची बचत होते. या हिशेबाने पेट्रोल-डिझेलचे दर लिटरमागे 14 रुपये कमी व्हायला हवेत. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती आहेत, त्या हिशेबाने क्रूड ऑइलचे इंडियन बास्केट बॅरलमागे सुमारे 85 डॉलर असायला हवे. मात्र ते 82 डॉलरच्या जवळपास आले आहेत. या दरावर ऑइल मार्केटिंग कंपन्यांना बॅरलमागे (159 लिटर) रिफायनिंगवर सुमारे 245 रुपये बचत होईल.
तीन मोठ्या कारणांमुळे स्वस्त कच्चे तेल

1. चीनमध्ये सत्ताविरोधी निदर्शने आणि कोरोनाचे प्रतिबंध वाढणे

2. प्रतिबंध असूनही रशियाचे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येणे

3. व्याजदर वाढल्याने अर्थव्यवस्था थंडावणे.

यामुळे घटू शकतात पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत गुरूवारी पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये लिटर होते. पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर नफा होत आहे, मात्र डिझेलवर अजूनही लिटरमागे 4 रुपये लिटर तोटा होत आहे.

70 डॉलरकडे वाढले ब्रेंट, मिळणार दिलासा

पेट्रोलियम तज्ञ नरेंद्र तनेजा यांनी सांगितले, ब्रेंट वेगाने 70 डॉलरच्या दिशेने जात आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की कमी होतील, थोडा वेळ लागेल. तेल आयातीपासून शुद्धीकरणापर्यंतचे चक्र 30 दिवसांचे असते. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती कमी झाल्यानंतर एका महिन्याने परिणाम दिसून येईल.

पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रामुख्याने चार घटकांवर अवलंबून असतात

कच्च्या तेलाची किंमत
रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचा दर
केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जमा केलेले कर
देशात इंधनाची मागणी

भारत आपल्या गरजेच्या 85% कच्चे तेल आयात करतो

आम्ही आमच्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त कच्चे तेल बाहेरून खरेदी करतो. याची किंमत आपल्याला डॉलरमध्ये मोजावी लागेल. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या मजबूतीमुळे पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. कच्चे तेल बॅरलमध्ये येते. एक बॅरल म्हणजे १५९ लिटर कच्चे तेल.
जून 2010 पर्यंत सरकारने पेट्रोलचे दर निश्चित केले होते आणि ते दर 15 दिवसांनी बदलले जात होते. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत सरकार डिझेलचे दर ठरवत असे.
19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.

Leave a Reply