बिग बींसह शाहरुख, रणवीर, अजयवर गुन्हा:

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अडचणींत वाढ, स्टारडमचा गैरवापर केल्याचा ठपका

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंग अडचणीत सापडले आहेत. पान मसाला आणि गुटख्याचा प्रचार केल्याने हे कलाकार अडचणीत सापडले आहेत. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने या सर्व स्टार्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चार कलमांतर्गत दाखल करण्यात आला गुन्हा
सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात कलम 467, 468, 439 आणि 120बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या चार स्टार्सवर पैशाच्या लालसेपोटी स्टारडमचा गैरवापर केल्याचा आरोपही आरोपपत्रात करण्यात आला आहे. वृत्तानुसार, या प्रकरणाची सुनावणी 27 मे रोजी होणार आहे.

हाश्मी यांनी का दाखल केला गुन्हा?
तमन्ना हाश्मी म्हणतात की, हे स्टार्स त्यांच्या लोकप्रियतेचा गैरवापर करत आहेत. या सगळ्यांना लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत करोडो लोक फॉलो करतात. अशा परिस्थितीत हे लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. स्टार्सकडून अशा ब्रँड्सच्या जाहिरातींचा मुलांवर वाईट परिणाम होतो आणि भविष्यातही ते असेच करतील.

अमिताभ यांनी करार संपुष्टात आणला होता
अमिताभ बच्चन पान मसालाच्या जाहिरातीत झळखल्यामुळे त्यांना बराच काळ ट्रोल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांनी 11 ऑक्टोबर रोजी त्यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त पान मसाला कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली होती. करार संपवण्यासोबतच बिग बींनी कंपनीला त्याचे पैसेही परत केले होते. करारावर स्वाक्षरी करताना बिग बींना ही सरोगेट जाहिरात असल्याची कल्पना नव्हती असे सांगण्यात आले होते. करार संपुष्टात आणताना बिग बींनी प्रमोशन फीदेखील परत केली होती.

अक्षयनेही मागितली होती माफी
अक्षय कुमारने अलीकडेच एका पान मसाला ब्रँडची जाहिरात केली होती. त्याला पान मसाल्याची जाहिरात करताना पाहून लोक संतापले आणि सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आले. वाढता वाद पाहून अक्षयने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली होती. अक्षयने आपल्या माफीनाम्यात लिहिले होते, “मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांत तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही. विमल पान मसालाच्या जाहिरातीत झळकल्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आणि तुमच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो.”

पुढे तो म्हणाला होता, “मी मोठ्या विनम्रपणे यातून माघार घेत आहे. तसेच मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मला मिळालेल्या पैशाचा मी चांगल्या कामासाठी वापर करेन.”

Leave a Reply