बिहारमध्ये वीज पडून 33 जणांचा मृत्यू:पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ 4 लाखांची मदत

पाटणा:-बिहारमधील 16 जिल्ह्यामंध्ये वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ईश्वर मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर काही ठिकाणी वीजादेखील पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत वीज पडून 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्य सरकार स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सक्रियपणे करत आहे. मुसळधार पावसानंतर बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या जिल्ह्यांत झाले मृत्यू

गुरुवारी वादळ आणि गडगडाटामुळे भागलपूरमध्ये 7, मुझफ्फरपूरमध्ये 6, सारणमध्ये 3, लखीसरायमध्ये 3, मुंगेरमध्ये 2, समस्तीपूर, जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहारमध्ये 2 तर दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीच्या काळात आपण पीडित कुटुंबांसोबत असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

खराब हवामानात घरीच राहा

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकांना आवाहन केले आहे की, खराब हवामानात सर्वांनी सतर्क राहावे. खराब हवामानाच्या प्रसंगी दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा. खराब हवामानात घरीच राहा आणि सुरक्षित राहा.

Leave a Reply