
मुसळधार पावसाने रायगड जिह्याला चांगलेच झोडपून काढले आहे बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अलिबाग : मुसळधार पावसाने रायगड जिह्याला चांगलेच झोडपून काढले आहे बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाडच्या सुकट गल्ली, भोईघाट परीसरात साडेतीन फूटांपर्यंत पाणी आहे. तर बाजारपेठेत तीन फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. दस्तुरीनाका, क्रांतीस्तंभ, शिवाजी महाराज चौक परीसरदेखील जलममय झाला आहे. शहराजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यातच महाबळेश्वर येथे होत असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरते आहे. त्यामुळे शहरात पूरस्थितीत वाढ झाली आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्याने दादली पूलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक गावांचा महाड शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. महाडच्या ग्रामीण भागालाही या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. नाते, बिरवाडी भागातही पुराचे पाणी साचले असून शेतं पाण्याखाली गेली आहेत .महाड नगरपालिकेने रात्री भोंगा वाजवून धोक्याचा इशारा दिला असून नागरीकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केले आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी नगरपालिकेने लाईफ बोटी आणि मनुष्यबळ सज्ज ठेवले आहे.
दरम्यान जिल्हयात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.दुसरीकडे कर्जत खालापूर तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे तेथेही पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. खोपोलीच्या सहयाद्रीनगर भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सावरोली पूलावरून पाणी वाहू लागल्याने या पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.