मी उद्धव साहेबांचाच शिवसैनिक:आमदार नितीन देशमुखांची स्पष्टोक्ती

आमदार नितीन देशमुखांची स्पष्टोक्ती, त्यांना माझा घात करायचा होता, हार्ट अटॅक आला हे धादांत खोटे

नागपूर:-महाराष्ट्रातील राजकीय गोंधळादरम्यान सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना झालेल्या मारहाणीची. शिंदे गटाने देशमुखांना हार्ट अटॅक झाल्याचे म्हटले होते. परंतु देशमुखांना मारहाण झाल्याचेही वृत्त आले होते. आता दस्तुरखुद्द आमदार नितीन देशमुख यांनी नागपुरात आल्यावर या सर्व प्रकारांवर माहिती दिली आहे.

काय म्हणाले नितीन देशमुख?

नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर पत्रकारांशी बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, माझी तब्येत पूर्णपणे चांगली आहे. गुजरातच्या शंभर ते दीडशे पोलिसांचा माझ्यावर पहारा होता. पोलिसांनी मला बळजबरीने रुग्णालयात नेलं, तेथे मला बळजबरी इंजेक्शन देण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी पकडून बळजबरी माझ्या दंडात इंजेक्शन टोचले. माझ्या शरीरावर माझ्या अनिच्छेने उपचार करण्यात आले. ते इंजेक्शन कशाचं होतं याची मला माहिती नाही. परंतु, मला जे हार्ट अटॅक झाल्याचं बोललं जात आहे, ते धादांत खोटं आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. हार्ट अटॅक सांगण्यामागे त्यांचा हेतू चुकीचा होता. आमचे मंत्री होते म्हणून मी सोबत गेलो होतो, पण मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे, असंही ते म्हणाले.

100 ते 150 पोलीस मागावर होते

रात्री हॉटेलमधून निघून मी रस्त्यावर आलो. त्यानंतर शंभर ते दीडशे पोलिस माझ्या मागावर होते. त्यांनी मला पकडून हॉस्पिटलमध्ये नेले आणि अटॅक आल्याचा बनाव रचला. या लोकांना माझा घात करायचा होता, असा आरोपही नितीन देशमुखांनी केला आहे.

दरम्यान, सुरतचे स्थानिक शिवसेना नेते परेश खेर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, नितीन देशमुख हॉटेलमधून बाहेर पडले आणि एका चौकात आले, जिथे त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे मदत मागितली. आम्ही चौकात पोहोचलो तोपर्यंत पोलीस त्यांना पकडून हॉटेलमध्ये घेऊन जात होते. आम्हीही त्याच्या मागे लागलो, पण आम्हाला हॉटेलच्या बारमध्ये थांबवण्यात आलं.

हॉटेलमध्ये गोंधळ झाल्यानंतर पोलिसांचा लाठीमार

आमदार नितीन देशमुख मुंबईला परत जाण्यावरून हॉटेलमध्ये गोंधळ घालत होते, त्यावेळी त्यांना पोलिस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. दुसरीकडे, दिव्य मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये गोंधळ सुरू असताना स्थानिक पोलीस अधिकारी आणि आमदार यांच्यात बाचाबाची झाली, त्यानंतर नितीन देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राऊत म्हणाले – नितीन यांना हृदयविकाराचा झटका आला होता

नितीन देशमुख यांना सुरतच्या हॉटेलमध्ये हृदयविकाराचा झटका आला, मात्र भाजपचे लोक त्यांना ओलीस ठेवत आहेत, असे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. राऊत पुढे म्हणाले होते की, त्यांच्या 9 आमदारांचे अपहरण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा पूर्ण तपास करतील. 9 आमदारांना मुंबईत परत यायचे आहे, मात्र त्यांना परत येऊ दिले जात नाही, असाही त्यांनी आरोप केला.

नितीन देशमुखांच्या पत्नीने काल केली होती बेपत्ता झाल्याची तक्रार

मंगळवारी नितीन देशमुख यांची पत्नी प्रांजली यांनी काल अकोला पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. प्रांजली यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळपर्यंत त्यांचे पती अकोल्यातील त्यांच्या घरी येणार होते, मात्र सोमवार संध्याकाळपासून त्यांचा फोन लागत नाही. माझे पती बेपत्ता झाले असून त्यांच्या जिवाला धोका आहे.

40 आमदार सुरतेतून गुवाहाटीला एअरलिफ्ट

राजकीय गोंधळाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 बंडखोर आमदार विशेष विमानाने गुवाहाटीला पोहोचले. भाजपच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळाबाहेर तीन बसमधून त्याला हॉटेलमध्ये नेण्यात आले. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत.

Leave a Reply