मुलाचा ताबा मिळवण्यासाठी वडिलांनी टोकाचं पाऊल उचलून;संतापाच्या भरात सासूचेच अपहरण

मुंबई ;- घरगुती, कौटुंबिक वाद हे वेळच्यावेळीच संपवलेले बरे. ते धुमसत राहिल्यास एखाद दिवस त्याचा असा स्फोट होतो की क्षणात सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. मुलाचा ताबा मिळवण्यासाठी वडिलांनी टोकाचं पाऊल उचलून असं कृत्य केलं ज्यामुळे सगळेच हादरले. रागावून माहेरी गेलेल्या आणण्यासाठी पती तिच्या माहेरी गेला, मात्र सासूने नकार दिल्याने तो संतापला. आणि त्याच संतापाच्या भरात जावयाने त्याच्या सासूचेच अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली.एवढेच नव्हे तर त्याने सासूला डांबून ठेवले आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचेही उघड झाले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासूची सुटका केली असून जावई भावेश मढवी व त्याचा मित्र सुरज म्हात्रे या दोघांना बेड्या ठोकत अटक केली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
आरोपी भावेश मढवी हा पत्नी दक्षिता आणि मुलासोबत नवी मुंबई येथील तळोजा परिसरात राहते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भावेश व दक्षतामध्ये वाद होत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून दक्षिता ही तिच्या मुलाला घेऊन डोंबिवलीत माहेर आली. मानपाडा हद्दीतील मलंग रोड अमरदीप कॉलनी येथे तिची आई राहते. त्यानंतर भावेशने अनेक वेळा दक्षिता हिला फोन केले, आणि मुलासह घरी बोलावले, पण ती काही परत गेली नाही. यामुळे भावेश संतापला आणि त्याने त्याचा मित्र सूरज म्हात्रे याच्यासह डोंबिवली गाठली.
बायकोच्या माहेरी गेल्यावर त्याने त्याची सासू दीपाली खोकरे हिच्याकडे पत्नी आणि मुलाची चौकशी करत वाद घालण्याास सुरूवात केली. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने सासूला कारमध्ये बसवले आणि चाकूचा धाक दाखवत नवी मुंबईतील तळोजा येथील आपल्या घरी नेले. भावेशने सासूला घरातच डांबून ठेवले. एवढेच नव्हे तर त्याने रागाच्या भरात सासूला लोखंडी रॉड व कात्रीने बेदम मारहाण केली. नंतर त्याने पत्नीला फोन केला आणि तुझी आई माझ्या ताब्यात आहे, असे धमकावत मुलाला परत सोडण्यास सांगितले.
त्याच्या फोनमुळे पत्नी दक्षता घाबरली आणि तिने लगेचच मानपाडा पोलिसांकडे धाव घेत पती विरुद्ध गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी या गुन्ह्याचं गांभीर्य घेत कल्याण झोन तीन डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी घेटे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या देखरेखित एपीआय सूर्यवंशी यांचे पथक बनवले. त्यानंतर एपीआय सूर्यवंशी व त्यांच्या टीमने जावई भावेश मढवी व त्याचा मित्र सुरज म्हात्रे यांना लगेचच बेड्या ठोकत ताब्यात घेतले आणि वृद्ध सासूची सुटका केली. ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी ज्ञानोबा सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply