राज’कारण:अयोध्या दौरा स्थगित, राज ठाकरे

अयोध्या दौरा स्थगित, राज ठाकरेंच्या स्वारीवर भाजपची लक्ष्मणरेषा! मुंबईतील उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती

मुंबई:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित राम जन्मभूमी-अयोध्येचा ५ जूनचा नियोजित दौरा स्थगित करण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मंुबईतील उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्वीची भूमिका पाहता राज यांच्या दौऱ्यास उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन भाजपनेच राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर लक्ष्मणरेषा आखून रोखले असल्याचे वृत्त आहे. कारण, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सिंह यांची भूमिका भाजपच्या फायद्याची ठरणार आहे.

राज यांनी स्वत: समाजमाध्यमांवर दौरा स्थगित केल्याचे शुक्रवारी जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी राज टेनिस खेळताना पडले होते. तेव्हा त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. आता पुन्हा त्यांच्या पायाचे दुखणे उद्भवले आहे, असे मनसेतील सूत्रांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक

उत्तर प्रदेशचा बहुचर्चित दौरा स्थगितीस कारण की….

१. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागितल्याशिवाय राज्यात येऊ देणार नाही, असा थेट इशारा दिला होता.
२. मनसे परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाही तोपर्यंत जवळीक नाही, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केले.
३. मुंबईत ४२ टक्के हिंदी भाषक आहेत. या व्होट बँकेच्या बळावर भाजप आगामी मुंबई पालिका निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहे.
४. राज यांनी अयोध्या दौऱ्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी, अशी काँग्रेस व इतर पक्षांकडूनही मागणी होत असल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

राज यांच्या दौऱ्याबाबत असे तर्कवितर्क

बृजभूषण यांच्या भूमिकेमुळे मुंबईतील उत्तर भारतीयांत भाजप आपला पाठीराखा असल्याची भावना दृढ होईल हा तर्क… म्हणून राज यांना थांबवले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा असा आहे की, राज यांची भाजपने गोची केली.

भाजप नेते प्रवीण दरेकर अजूनही म्हणतात, राज ठाकरे अयोध्येला नक्की जातीलच… या माध्यमातून राज समर्थकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न.

हनुमान चालिसाचे आंदोलन भाजपच्या सांगण्यावरूनच झाल्याचा होता आरोप

हनुमान चालिसा पठणाचे आंदोलन भाजपच्या सांगण्यावरून राज यांनी हाती घेतल्याचे यापूर्वी झालेले आरोप पाहता अयोध्या दौरा रद्द होण्याला महापालिका निवडणुकीचीच पार्श्वभूमी असल्याचे मानले जात आहे. मुंबईतील शिवसेनेची मराठी व हिंदुत्ववादी मते पळवण्याचा टास्क भाजपने मनसेला दिला होता. त्यानुसार मनसेने भोंग्याचे आंदोलनही केले. राजना हिंदुजननायक उपाधी लाभली. त्याच आंदोलनाचा अयोध्या दौरा भाग होता.

Leave a Reply