राजू श्रीवास्तव यांचे दिल्ली AIIMSमध्ये निधन:हार्ट अटॅकनंतर 42 दिवसांपासून सुरू होते उपचार

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची अखेर जीवन-मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांचे आज निधन झाले. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. बुधवारी पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

मागील 42 दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वृत्त येत होते. मात्र अखेर त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळगावी कानपूरमध्ये नव्हे तर दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

या दु:खद घटनेदरम्यान त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी आधीच यमराज आणि मृत्यूचा उल्लेख केला आहे. राजू यांचा हा व्हिडिओ खूप जुना आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहे की, ”नमस्कार, आयुष्यात असे काम करा की यमराज जरी तुम्हाला न्यायला आला तरी त्याला सांगा तू म्हशीवर बस. आपण चालत आहात, बरे वाटत नाही. तू चांगला माणूस आहेस, थोर माणूस आहेस, म्हणून तुम्ही म्हशीवर बसा.’ त्यांचा हा व्हिडिओ कॉमेडी अंदाजात केलेला जरी असला तरी लोक आता हा व्हिडिओ पाहून त्यांची आठवण काढत आहेत.
राजू यांचे हीरो बनण्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी ते 1982 मध्ये मुंबईत आले होते.. त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी ऑटोरिक्षा चालवली. एकेदिवशी त्यांच्या ऑटोत स्वार असलेल्या व्यक्तीने त्यांना पहिल्या स्टेज परफॉर्मन्सची संधी दिली. यातून त्यांची 50 रुपये कमाई झाली होती.

राजू बहुतेक वेळा अमिताभ यांची नक्कल करायचे आणि त्यांच्यासारखे दिसायचा प्रयत्न करायचे. नंतर हीच त्यांची ओळख बनली. 1988 मध्ये ‘तेजाब’ या चित्रपटात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. हीरो होते अनिल कपूर. आणि जॉनी लिव्हरसोबत राजू ही या चित्रपटात झळकले.

1994 मध्ये दूरदर्शनवरील टी टाइम मनोरंजन या शोमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यानंतर ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये राजू तिसरा स्थानी राहिले. इथून त्यांची लोकप्रियता वाढू लागली. त्यानंतर त्यांनी कॉमेडी का महामुकाबला, कॉमेडी सर्कस, देख भाई देख, लाफ इंडिया लाफ, कॉमेडी नाईट विथ कपिल, द कपिल शर्मा शो आणि गँग्स ऑफ हंसीपूर सारखे कार्यक्रम केले.
राजू यांनी 17 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची सुरुवात तेजाब या चित्रपटापासून झाली. तो काळ टिपिकल हीरो चित्रपटांचा होता, ज्यात लोक मुख्य नायकाला पाहण्यासाठी टॉकीजमध्ये जात असत. पण यादरम्यान एका सामान्य चेहऱ्याने लोकांचे स्वतःकडे लक्ष खेचले.
राजू यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. कामानिमित्त दिल्लीतील पक्षातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीत पोहोचले होते. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या साऊथ एक्स येथील कल्ट जिममध्ये ते सकाळी वर्कआउट करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
11 ऑगस्ट रोजी राजू यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 100 टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळून आले होते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले होते. 13 ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचे समोर आले होते. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

राजू नेहमी त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत असे आणि ते फिटदेखील होता. 31 जुलैपर्यंत ते सतत शो करत होता, अनेक शहरांमध्ये त्यांचे शो होणार होते.

Leave a Reply