राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेला मोठा धक्का

वसंत मोरेंचे कट्टर समर्थक निलेश माझीरे यांनी ठोकला पक्षाला रामराम

पुणे:-राज ठाकरेंची येत्या 22 मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी यांना पक्षाला रामराम ठोकला आहे. निलेश माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पुणे महागनरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माझीरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने हा मनसेसाठी धक्का मानला जात आहे.

शिवसेनेते प्रवेश करणार?

निलेश माझीरे यांनी नुकतीच शिवसेना नेते सचिन आहिर यांची भेट घेतली होती. यानंतर निलेश माझीरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरू आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे मनसेला माझीरे यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत आपला पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे मनसे पक्षात खळबळ उडाली आहे.

राज आज पुण्यात

22 मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे आज शिवतीर्थहून पुण्याच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी ट्विटवरून 5 जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण राज ठाकरे यांनी स्पष्ट केले नव्हते. त्यांनी मनसैनिकांना पुण्याच्या सभेला येण्याचे आवाहन केले आहे. याठिकाणी राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अयोध्या दौरा पुढे…

राज ठाकरे यांच्या पायाला एक ते दीड वर्षांपूर्वी दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना याचा त्रास जाणवत होता. या दुखापतीसंदर्भात मध्यंतरी त्यांनी उपचारही घेतले होते. परंतु, आता या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले आहे. राज ठाकरे यांच्या पायासंदर्भातील समस्येवर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याची पुन्हा गरज लागू शकते. शस्त्रक्रिया झाली तर ते लगेच दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांना नाईलाजाने का होईना पण अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला, असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply