लहान मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याचा आरोप; केंद्र सरकारकडून चॅनलला नोटीस

एका तामिळी चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये नोटबंदीवर व्यंग करताना पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कपड्यांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. आता या प्रकरणी संबंधित चॅनलला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली असून, या प्रकरणी स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

चेन्नई : एका तामिळी चॅनलवरून (Tamil Channel) प्रसारित होणाऱ्या लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये नोटबंदीवर व्यंग करताना पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi) आणि त्यांच्या कपड्यांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. आता या प्रकरणी संबंधित चॅनलला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (Ministry of Information and Broadcasting) वतीने नोटीस पाठवण्यात आली असून, या प्रकरणी स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार तामिळनाडूमधील भाजपच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर या चॅनला नोटीस पाठवण्यात आली आहे. सीटीआर निर्मल कुमार यांच्या तक्रारीनुसार ज्युनियर सुपर स्टार्स सीझन 4 नावाचा एक रिअॅलिटी शो झी तमिळवर प्रसारित केला जातो. शनिवारी 15 जानेवारी रोजी प्रसारीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये दोन मुलांनी एक विनोदी नाट्य सादर केले. या नाट्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?
निर्मल कुमार यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, या कार्यक्रमाचे अँकरिंग अभिनेत्री स्नेहा ही करत होती, तर आरजे सेंथिल आणि कॉमेडियन अमुधवन हे या कार्यक्रमाचे जज होते. या कार्यक्रमामध्ये 14 वर्षांखालील दोन स्पर्धकांनी एका तामिळ चित्रपटाची थीम स्वीकारली होती. मात्र त्या थीमवर नाट्य सादर करताना नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांची खील्ली उडवण्यात आली. या प्रकरणी झी तामिळला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती निर्मल कुमार यांनी दिली आहे.

सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार निर्मल कुमार यांनी असा देखील दावा केला आहे की, झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडचे ​​मुख्य क्लस्टर ऑफिसर सिजू प्रभाकरन हे लवकरच या संदर्भातील सर्व सामुग्री चॅनल तसेच सोशल मीडियावरून हटवणार आहेत. तसेच चॅनल लवकरच या प्रकरणी स्पष्टीकरण देईल. दरम्यान या प्रकरणी बोलताना माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 15 जानेवारी रोजी आमच्याकडे या संदर्भात एक तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या आधारे आम्ही संबंधित चॅनलला नोटीस पाठवली असून, येत्या सात दिवसांच्या आत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

Leave a Reply