लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले

पुणे:-केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने एका खासगी व्यक्तीच्या मध्यस्थीने ठेकेदाराकडे ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
ग्रामसेवक नवनाथ चव्हाण (वय ३६) आणि खासगी व्यक्ती सचिन वायसे (३३) यांच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी दौंड तालुक्यातील गार ग्रामपंचायतीच्या अखत्यारित बंदिस्त गटारीचे काम केले होते. त्यासाठी निश्चित केलेले पैसे मिळावे, यासाठी तक्रारदाराने पाठपुरावा केला होता. ते बिल काढण्यासाठी ग्रामसेवक चव्हाणने तक्रारदाराकडे ३१ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. या व्यवहारात चव्हाणच्या वतीने वायसेने मध्यस्थी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर, लाच मागितल्याप्रकरणी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून चव्हाणला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply