विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट

राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे.

मुंबई:- राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. गेले दोन दिवस पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर कोकणातही धुवाधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर काही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आणि कुलाबा वेधशाळेने विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. नदी काठच्या गावांता सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर ग्रामीण भागात अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. काटोल-वरुड रस्ता पाण्याखाली असल्याने पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. तर राज्य मार्ग 253 पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बंद आहे. जाम नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात जनजीवन ठप्प झालंय. एटापल्ली आणि मुलचेरा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. तर गडचिरोली तालुक्यातही गेल्या 24 तासात 100 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. आष्टी- आलापल्ली मार्गावरील दिना नदीचा पूल पुराखाली आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. खेड,चिपळूण, दापोलीसह गुहागर तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून इशारा पातळीचीच्यावर पाणी आल्याने प्रशासन सर्तक झाले आहे. दरम्यान रघुवीर घाटात ही दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
तसेच राजापूर मधीलशहरात जवाहर चौकात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. तर लांजा येथील अंजणारी येथील दत्त मंदिर पाण्याखाली बुडाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यासाठी पुढील 48 तास रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यापुढे तीन दिवस ऑरेंज अलर्ट राहणार आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील लोणवडी येथील केशरी नदीला पूर आला. या पुराने ईळने,माळवी, वाघिवणे या गावांचा संपर्क तुटला. लोणवळी आणि ईळने गावांना जोडणारा केशरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं दोन्ही कडील वाहतूक बंद करण्यात आली.

कोल्हापूर पोलिसाच्या आदेशानुसार करुळ आणि भुई बावडा घाटात दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व वाहतूक फोंडा घाटामार्गे वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.कोल्हापुरातल्या काटेभोगावला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. पावसामुळे इथल्या नदी नाल्यांना पूर आलाय. या पाण्यात बाईक टाकणं एका तरूणाच्या जिवावर बेतलं असतं. पुराचं पाणी वाढलेलं असतानाही या बाईकस्वारानं पाण्यात बाईक टाकली मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या बाईकस्वाराचा जीव वाचलाय. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरु असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे..त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
सांगली जिल्ह्यातील वारणा धरण 83 टक्के भरलंय. धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले.. सांडव्यातून 3 हजार क्यूसेक पाणी वारणा नदीत सोडलं जातंय. त्यामुळेही वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय. कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेलेत.

यवतमाळ जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे दिग्रस तालुक्यातील अरुणावती धरणात 86 % पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत. परिणामी अरुणावती नदीच्या काठावर वसलेल्या 16 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्प हा 85 टक्के भरला. प्रकल्पाचे दहाही दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. पाण्याची आवक अशीच राहिली तर सर्व दहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याचे निर्देशही देण्यात आलेत.

शिर्डीच्या कोपरगाव परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेळापूर शिवारातील कडकडी बंधारा फुटला. यामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्याने शेतक-यांचं नुकसान झालंय…बंधारा फुटल्यामुळे रस्ता खचला असून या रस्त्यावरून शिर्डी-लासलगावचा संपर्क तुटलाय… रस्ता बंद झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय…

वाशिम जिल्ह्यात सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 26 गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांमध्ये पाणी साचल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Leave a Reply