शह-काटशह:…म्हणून अमित शहांचा नाशिक दौरा रद्द

म्हणून अमित शहांचा नाशिक दौरा रद्द; अग्निपथ नव्हे तर ऑपरेशन लोट‌्स हेच मुख्य कारण

नाशिक:-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सोमवार आणि मंगळवारी नियोजित असलेला नाशिक व त्र्यंबकेश्वर दौरा रविवारी रात्री अचानक रद्द झाला तेव्हा त्यासाठी अग्निपथ धोरणाविरोधातील आंदोलनाचा संदर्भ दिला जात होता, मात्र त्यामागचे इंगित एकनाथ शिंदे यांच्या बंडाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आता भाजपच्या अंतर्गत गोटात रंगू लागली आहे. एकप्रकारे हादौरा रद्द होणे ही बाब राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी अग्निपथ ठरला असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड, त्यामुळे धोक्यात आलेले महाविकास आघाडी सरकार या सर्वांची कुणकुण शिवसेना व दोन्ही काँग्रेसमधील चाणक्यांना कशी लागली नाही, असा प्रश्न असताना शहा यांनी सर्व चाचपणी करून निश्चित केलेला प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचादौरा अचानक रद्द करण्यामागे महाराष्ट्रातील ‘आॅपरेशन लाेट‌्स’चे कारण होते, असाही ठाम दावा या पक्षातील सूत्रांकडून केला जात आहे.

अध्यात्माचे अधिष्ठान असलेल्या शहा यांनी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांकडून आलेले निमंत्रण चटकन स्वीकारले होते. खुद्द शहा हे नाशिकमध्ये येणार म्हणून जाेरदार स्वागताची तयारी सुरू झाली होती. विधानपरिषदेचे मतदान आटोपून दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे नाशकात परतण्याची तयारी केवळ स्थानिक आमदारांनीच नव्हे तर खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संपर्कनेता तथा माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही केली होती. मात्र, कार्यक्रमाच्या दोन दिवस आधीच लष्कराच्या अग्निपथ याेजनेवरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांना दिल्लीतील मुख्यालय सोडता येत नाही, असे कारण देत त्यांच्याएेवजी उद‌्घाटनाची जबाबदारी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांच्याकडे देण्यात आली.

त्यात राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणूक मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालल्यास फडणवीस व महाजन हेही येतील की नाही, अशी शंका व्यक्त होत गेली. शहा, फडणवीस येणार नाही म्हणून स्वाभाविकच भाजपचा आवेशही कमी झाला होता. मात्र रात्री अचानक पुन्हा फडणवीस व महाजन हे नाशिकला येणार, अशी वर्दी धाडली गेली. त्यातून सर्व लक्ष नाशिककडे केंद्रित झाले होते, मात्र रातोरात शिंदे यांनी १७ आमदारांसह सुरत गाठल्यानंतर सकाळपासून शिवसेनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. इकडे, नाशकातील कार्यक्रमाला येण्याचे सांगून फडणवीस यांनी दिल्ली गाठल्यामुळे मग चर्चेला उधाण आले. त्यातून शहा यांचादौरा रद्द होण्यामागे अग्निपथ नव्हे तर आॅपरेशन लाेट‌्स हेच कारण असल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगली.

महाजनांच्या कानात फडणवीस काय पुटपुटले ?
राज्यसभा व विधानपरिषद या दोन्ही निवडणुकीत फडणवीस यांचे खास अशी आेळख असलेले नाशिकचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे प्रभारी गिरीश महाजन यांना विशेष जबाबदारी दिली होती. महिनाभरापासून ते मुंबईत तळ ठाेकून होते. वसई-विरारला जाऊन बहुजन विकास आघाडीची तिन्हीही महत्त्वपूर्ण मते मिळवण्यासाठी त्यांनी शिकस्त केली होती. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा पाचवा उमेदवार विजयी झाल्यानंतर एकच जल्लोष झाला. या विजयाचे केंद्रबिंदू असलेले फडणवीस हे जल्लोषाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी महाजन यांना कडाडून मिठी मारत त्यांची पाठ थोपटताना कानमंत्र दिला. मात्र, त्यांची एकूणच देहबाेली काहीतरी गंभीर सूचना दिल्या जात असल्यागत होती.

त्यानंतर महाजन हेदेखील रातोरात अज्ञात कामगिरीकडे रवाना झाले. मंगळवारी सकाळी शिंदे यांच्या बंडाच्या बातम्या सुरू झाल्यानंतर फडणवीस महाजन यांच्या कानात नेमके कोणता आदेश देण्यासाठी काय पुटपुटले याची चर्चा सुरू झाली. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने थेट महाजन यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले की, ‘मला जे आदेश दिले जातात, त्याचे अचूक पालन करणे इतकेच मला समजते. दोन्ही निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सूचना दिल्या याचा लवकरच उलगडा होईल’ असे सांगत रहस्य कायम ठेवले.

Leave a Reply