शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार दाेषी शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करणार : शशिकांत चिमणे

पुणे:-शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत पुणे सायबर पाेलिसांनी सखाेल तपास केला आहे. त्यांनी राज्य परीक्षा परिषदेस एकूण ७८८० नावांची यादी दिली. संबंधित यादीची तपासणी केली असता त्यातील सहा नावे दुबार आढळल्याने एकूण ७८७४ जणांवर कायमस्वरूपी परीक्षा बंदीची कडक कारवाई करण्यात आली आहे. सदर यादीत अपात्र असून शिक्षक सेवेत कार्यरत असलेल्या दाेषी शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली जाणार आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे ही सदर यादीत आहे. टीईटी २०१९ च्या परीक्षेप्रमाणेच २०१८ च्या टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले असून त्यातील १७०१ उमेदवारांवरही लवकरच कडक कारवाई करण्यात येईल,असे राज्य परीक्षा परिषदेचे अधीक्षक शशिकांत चिमणे यांनी सांगितले.
टीईटी घोटाळ्यात पुणे सायबर पाेलिसांनी एकूण ८७ उमेदवारांकडे केलेल्या तपासात ७६ उमेदवार अंतिम निकालात अपात्र असल्याचे अाणि ३ उमेदवार परीक्षेस अनुपस्थित असल्याचेही उघडकीस आले आहे. सन २००९ मध्ये आरटीई कायदा झाल्यानंतर राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे बंधनकारक करण्यात आले. तसेच अपात्र शिक्षकांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार राज्यात प्रथम २०१३ मध्ये टीईटीची परीक्षा पार पडली. पहिली ते पाचवी इयत्तेसाठी शिक्षक पदासाठी १५० गुणांची टीईटी क्रमांक एकची परीक्षा द्यावी लागते, तर सहावी ते आठवीच्या वर्गाकरिता टीईटी दाेनची परीक्षा देता येते. यासाठी डीएड, पदवीधारक पात्रता आहे. त्याचप्रमाणे ९वी ते १२वी वर्गाकरिता वेगवेगळ्या विषय शिक्षक पदाकरिता बीएड झालेल्यांना अभियाेग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा द्यावी लागते. मात्र, सन २०१८ व २०१९ च्या टीईटी परीक्षेचा पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी परीक्षेचे अायाेजन करणाऱ्या कंपनी अधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली.

Leave a Reply