‘सरकारशिवाय कोणालाही रेमडेसिवीर खरेदीचा अधिकार नाही’

यासंबंधी माझ्याशी त्यांची चर्चाही झाली होती. त्यावेळेसही देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, अशा प्रकारची खरेदी तुम्हाला करता येणार नाही.

मुंबई : सरकारशिवाय कोणालाही रेमडेसिवीर खरेदी करण्याचा अधिकार नसल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही खासगी संस्था किंवा व्यक्तीला रेमडेसिवीर खरेदी करता येत नाही, तसेच त्याचा साठा करता येत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

हा तर विरोधकांचा खोडसाळपणा-शिंगणे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी दमणच्या ब्रुक्स फार्मा कंपनीकडून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणणार असे सांगितले होते. यासंबंधी माझ्याशी त्यांची चर्चाही झाली होती. त्यावेळेसही देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, अशा प्रकारची खरेदी तुम्हाला करता येणार नाही. मात्र आता या खरेदीसंदर्भात माझ्याशी बोलणं झालं होतं आणि त्याची परवानगी दिली होती असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. हा एक खोडसाळपणा आहे असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे.

सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप
सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीबाबत विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजारही केला जात असल्याचे समोर आले आहे. इंजेक्शनचा तुटवडा पाहता भाजप नेत्यांकडून दमण मध्ये असलेल्या ब्रुक फार्मा या कंपनीकडून 50 हजार इंजेक्शन्स आणण्याचा दावा करण्यात आला होता. तसेच यासाठी एफडीए आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून परवानगी घेतल्याचेही भाजपकडून सांगण्यात आलं होतं. मात्र राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करायचा होता का? असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर थेट विरोधी पक्षाच्या नेत्यांवर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार केल्याचा आरोप केलाय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या मुद्द्यावरून झडताना दिसत आहे.

Leave a Reply