
नागपूर:- नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामधल्या हेटी-सुरला येथे गुरुवारी वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वासुदेव उर्फ कवडू रेवाराम खंगारे (43, पहलेपार, ता. सावनेर) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेच्या वेळी ते हेटी सुरला येथील आपल्या शेतात काम करीत होते.
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात
झाली. तालुक्यातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी
वाऱ्याला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली. पावसाची सुरुवात होताच खंगारे हे शेतातील
एका झाडाखाली आश्रय घेण्याकरीता गेले. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जमिनीवर कोसळले. ही
बाब शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आली. त्यांच्याकडे धाव घेत आरडाओरड सुरू केली. तत्काळ
शासकीय रुग्णालय सावनेर दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात
आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले व दोन लहान भाऊ, असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह
कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.