
मुंबई:- ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर यांचं निधन झालं. नेरुळमध्ये त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या अध्यात्माच्या विचार प्रसाराच्या कार्यात त्यांनी सक्रीय योगदान दिलं. रूक्मिणी सातारकर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबतची माहिती सातारकर कुटुंबियांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिलीय. बाबा महाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केलीय. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. बाबा महाराज सातारकर यांच्या धार्मिक कार्यात त्यांच्या पत्नी रुक्मिणी उर्फ माईसाहेब यांचीही मोलाची साथ होती. बाबा महाराज यांच्या घरात गेल्या १३५ वर्षांपासून वारकरी सांप्रदयाची परंपरा आहे. बाबा महाराज सातारकर यांचं इंग्रजी माध्यमात एसएससीपर्यंत शिक्षण झालंय. तर ८व्या वर्षांपासून ते कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणायचे. बाबा महाराज यांच्याकडे गेल्या ८० वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानकरी परंपरा आहे. तर तुकारम महाराज पालखी सोहळ्याबरोबर मानकरी परंपरा १०० वर्षांपासून राखली आहे.