युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाने मागितली खंडणी

नागपूर:-शिवसेनेचे शहरप्रमुख मंगेश कडव यांच्यावर २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप होत असतानाच आता युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाने सावकाराला आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली. अजनी पोलिसांनी सापळा रचून युवासेनेचा जिल्हाप्रमुख विक्रम राठोड याचा भाऊ व विभागप्रमुखाला शनिवारी रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे सेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.संजोग सुरेश राठोड (३४, रा. अध्यापकनगर, हुडकेश्वर) असे खंडणीबहाद्दराचे नाव आहे. पोलिस विक्रम राठोडचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महबूब पाशा शेख अब्दुल गफ्फार शेख (वय ३५, रा. पारडी) हे परवानाधारक सावकार आहेत. गणेशपेठ परिसरात त्यांचे कार्यालय आहे. दहा दिवसांपूर्वी विक्रमने महबूब यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘तू अवैध वसुली करीत आहेस. तुझा भंडाफोड करणार आहे. काम सुरळीत सुरू ठेवायचे असल्यास १५ लाख रुपये दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.

माझी मुंबईत ओळख असून, तुझा परवाना रद्द करेल’, अशी धमकी विक्रमने सावकाराला दिली. एवढी रक्कम देण्यास सावकाराने असमर्थता दर्शविली. त्यानंतर विक्रमने आठ लाख रुपये मागितले. पाच लाख रुपये शनिवारी व उर्वरित तीन लाख रुपये सोमवारी देण्याचा दम विक्रमने दिला. तसेच सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पैसे घेऊन सावकाराला मेडिकल चौकात बोलाविले. शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सावकाराने अजनी पोलिस स्टेशन गाठत विक्रमविरोधात तक्रार दिली.

पोलिस तक्रार लिहित असतानाच विक्रमने सावकाराच्या मोबाइलवर संपर्क साधला. सावकाराने पोलिसांना सांगितले. अजनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. दोन पोलिस सावकाराच्या एमएच-४९-बीबी-३८४८ या क्रमांकाच्या कारमध्ये बसले. सावकारासह कारने मेडिकल चौकात गेले. विक्रमने पुन्हा सावकाराच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मेडिकल चौकाजवळील शांती निकेतन शाळेजवळ माझा माणूस पैसे घ्यायला येईल, तू तेथे पोहोच’, असे सांगितले. सावकार शेख पोलिसांना घेऊन कारने शांती निकेतन शाळेजवळ गेले. याचवेळी एमएच४९-बीएफ-०७३३ या क्रमांकाच्या मोपेडने संजोग तेथे पोहोचला. सावकाराला पैशाची मागणी करताच पोलिसांनी संजोगला अटक केली. पोलिसांनी विक्रम व संजोगविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. विक्रम हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Reply