IPL 2021 : हैदराबादवर आठ गडी राखत दिल्लीचा विजय, गुणतालिकेत दिल्ली अव्वल स्थानी

आयपीएल 2021 च्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर 8 गडी राखत विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत दिल्लीचा संघाने 14 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबादच्या संघाने दिल्लीच्या संघासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाने 17.5 षटकांत केवळ दोन गडी गमावून 139 धावा पूर्ण केल्या.

दुबई - आयपीएल 2021 च्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर 8 गडी राखत विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत दिल्लीचा संघाने 14 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबादच्या संघाने दिल्लीच्या संघासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाने 17.5 षटकांत केवळ दोन गडी गमावून 139 धावा पूर्ण केल्या. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने 37 चेंडूत 42 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर 41 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या तर कर्णधार रिषभ पंतने 21 चेंडून 3 षटकार व 2 चौकाराच्या मदतीने 35 धावांवर नाबाद राहिला.

नाणेफेक जिंकत हैदरबादने घेतला होता प्रथम फलंदाजीचा निर्णय
सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डेविड वॉर्नर आणि रिद्धीमान साहा ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी आली. पण, एनरिच नार्खिया याने पहिल्याच षटकात डेविड वॉर्नरला भोपळाही फोडू दिला नाही. त्याने त्याला शून्यावर अक्षर पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर रिद्धीमान साहाच्या (18) रुपाने हैदराबादला दुसरा धक्का बसला. कगिसो रबाडा याने त्याला शिखर धवन करवी झेलबाद केले.

मनिष पांडे आणि केन विल्यमसन या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, केन विल्यमसनचा झेल हेटमायरने टिपला. विशेष म्हणजे केन विल्यमसनला या झेलपूर्वी दोन जीवदान मिळाले होते. तरीही तो या जीवदानाचा फायदा घेऊ शकला नाही. त्याने 18 धावा केल्या. विल्यमसन पाठोपाठ मनिष पांडेही तंबूत परतला. पांडेला कगिसो रबाडाने स्लोवर वन चेंडूने चकवले. बॅटची कट घेऊन उडालेला झेल खुद्द रबाडानेच घेतला. त्याने 17 धावांची खेळी केली.

एनरिक नार्खियाने केदार जाधवला (3) पायचित करत हैदराबादला पाचवा धक्का दिला. तेव्हा अब्दुल समद आणि जेसन होल्डर जोडीने सुरूवातील एकेरी दुहेरी धाव घेत संघाची धावसंख्या वाढवली. पण अखेरच्या हाणामारीच्या षटकात जेसन होल्डर (10) अक्षर पटेलचा बळी ठरला. तेव्हा अब्दुल समदने डावाची सुत्रे हाती घेत संघाला शंभरी पार करून दिली. त्याला राशिद खानने साथ दिली.

समदची विकेट रबाडाने घेतली. त्याने 2 चौकार आणि 1 षटकारासह 28 धावा केल्या. तर राशिद खान 22 धावांवर धावबाद झाला. भुवनेश्वर कुमार 5 धावांवर नाबाद राहिला. अखेरीस हैदराबादच्या संघाला 9 बाद 134 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर एनरिक नार्खिया आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2-2 गडी बाद करत रबाडाला चांगली साथ दिली.

दिल्लीने दिले चोख प्रत्युत्तर
त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ व शिखर धवन ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरली. विल्यमसन खलील अहमदच्या चेंडूवर पृथ्वी शॉ याला झेलबाद केले. शिखर धवनने 37 चेंडूत एक चौकार व सहा षटकाराच्या मदतीने 42 धावा काढल्या आणि राशिद खानच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात अब्दूल समदकडे झेल दिला. त्यानंतर श्रेयस अय्यर (47 धावा) व कर्णधार रिषभ पंत (35 धावा) यांच्या नाबाद खेळीमुळे दिल्लीच्या संघाने 17.5 षटकांत दोन गडी गमावून 139 धावा पूर्ण करत सामना जिंकला.

दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानी

दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल-2021 मालिकेत नऊ सामने खेळले. त्यापैकी केवळ दोन सामन्यात पराभव पत्करत 7 सामन्यांत विजय मिळवला. यामुळे दिल्लीचा संघ 14 गुण मिळवतगुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानी
सनरायझर्स हैदराबाद संघाने मालिकेत 8 सामने खेळ केवळ एक विजय मिळवला असून 7 सामन्यांत त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. यामुळे हैदराबादचा संघ केवळ दोन गुणांसह शेवटच्या स्थानी आहे.

Leave a Reply