T20 World Cup 2021: श्रीलंकेचा आयर्लंडवर दमदार विजय, सुपर 12 मध्ये दणक्यात एन्ट्री

टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात श्रीलंका संघाने आयर्लंड संघाला तब्बल 70 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयासह त्यांनी सुपर 12 मध्येही स्थान मिळवलं आहे.

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यांना सुरुवात झाली असून ग्रुप स्टेजेसचे सामने संपत आले आहेत. नुकत्याच झालेल्या श्रीलंका विरुद्ध आयर्लंड सामन्यात श्रीलंका संघाने आय़र्लंडला 70 धावांनी मात देत विजय मिळवला आहे. या विजयासह त्यांनी सुपर 12 फेरीतही स्थान मिळवलं आहे. आधी नामिबीयावर 7 गडी राखून विजय मिळवल्यानंतर आता श्रीलंकेने या दुसऱ्या विजयासह हे यश संपादन केलं आहे.

सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत आयर्लंड संघाने गोलंदाजी निवडली. हा निर्णय त्यांच्यासाठी सुरुवातीला तसा चांगला ठरला पण नंतर मात्र श्रीलंकेच्या काही फलंदाजांनी तडाखेबाज खेळी करत तब्बल 171 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये सलामीवीर पाथुम निसांकाने 61 धावा केल्या. तर अष्टपैलू वनिंदू हसरंगाने धमाकेदार खेळी करत 10 चौकार आणि एक षटकार खेचत 47 चेंडूत 71 धावा केल्या. अखेरच्या काही चेंडूत कर्णधार शनाकाने दमदार फलंदाजीने नाबाद 21 धावा करत संघाला मोठी धावसंख्या करुन दिली.

आयर्लंड 101 धावांत सर्वबाद

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आयर्लंड संघाचे फलंदाज सुरुवातीपासूनच खराब कामगिरी करु लागले. केवळ अँड्र्यू बलबिर्न (41) आणि कर्टिस कॅम्फर (24) यांनी थो़डीफार झुंज दिली. पण त्यांनाही नंतर अपयश आल्याने सर्व संघ अवघ्या 101 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे श्रीलंका 70 धावांनी विजयी झाली. श्रीलंकेकडून महिश थीकशानाने 3, करुणारत्ने आणि एल कुमारा यांनी प्रत्येकी 2 आणि हसरंगा आणि चमिरा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.या विजयामुळे श्रीलंका संघ सुपर 12 मध्ये पोहोचला असून नेमका कोणत्या ग्रुपमध्ये जाईल हे 22 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल.

Leave a Reply