अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीत घोटाळा केला किरीट सोमय्यांचा आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पावर यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकरण्यात आले होते. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरीही छापेमारी झाली होती. याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीत घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या कारखान्याच्या खरेदी-विक्रीत अजित पवारांनी सर्व नियमांचं उल्लंघन केलंय, त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं सोमय्या यांनी म्हटलंय. तसेच या कारखान्यातील घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याचंही सोमय्या म्हणाले.

अजित पवारांनी स्वतःच अर्थमंत्री असताना त्या कारखान्याचा लिलाव करायला लावला आणि स्वतःच्याच कंपनीला घ्यायला लावला, असा आरोप सोमय्या यांनी केला. गेल्या काही दिवस आयकर विभागाकडून छापेमारी झाल्यानंतर भाजपा हीन दर्जाचं राजकारण करत असून माझ्या बहिणीच्या घरी धाडी टाकल्या, असं भावनिक वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. यावरून सोमय्या यांनी निशाणा साधला.जरंडेश्वर कारखान्याचे मालक मोहन पाटील, विजया पाटील आणि निताताई पाटील आहेत. हे तिन्ही जण कोण आहेत, हे पवार कुटुंबांनी समोर येऊन सांगावं. विजया पाटील आणि निताताई पाटील या अजित पवारांच्या बहिणी आहेत. दरम्यान, जर बहिणींनी कोणताही घोटाळा केला नसेल, तर बहिणींच्या नावाने अजित पवारांनी बेनामी संपत्ती उभी केली आहे, का असा सवाल किरीट यांनी केला. तसेच तुम्ही बहिणींना न सांगताच ही मालमत्ता गोळा केली का असा प्रश्न विचारत या तिन्ही जणांच्या अनेक कंपन्या आहेत आणि त्या कंपन्याचे अजित पवारांच्या कंपन्यांशी व्यवहार झाले आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावाने १९ बंगले विकत घेऊ शकतात. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बहिणींच्या नावाने बेनामी संपत्ती गोळा करूच शकतात, असं सोमय्या म्हणाले. तसेच जरंडेश्वर कारखान्याचे सर्वात जास्त शेअर हे अजित पवारांच्या नावावर असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

Leave a Reply