किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांकडून धक्काबुक्की

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज पुणे महापालिका कार्यालयात आले. पण यावेळी प्रचंड मोठा गदारोळ झाला. सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं. सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. विशेष म्हणजे यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने सोमय्या यांना सुरक्षितपणे गाडीत बसवलं आणि तिथून बाहेर काढलं. पण यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला.
“किरीट सोमय्या आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत आहेत. त्यांच्या घरामध्ये म्हणजे पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार होतोय. तो भ्रष्टाचार आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. त्यावर त्यांना बोलायला भाग पाडायचं होतं. त्याबाबत त्यांना निवेदन द्यायचं होतं. त्यासाठीच आम्ही गेल्या एक तासापासून इथे थांबलो होतो. ते अर्धातास उशिरा आले. आमची दिशाभूल केली गेली. ते नवीन गेटला आले असं सांगण्यात आलं. तिथून आम्ही या ठिकाणी पळत आलो. त्यांच्यासमोर निवेदन केलं. त्यांच्यासमोर पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावलं. आम्हाला ढकलून दिलं. काही कार्यकर्ते त्यांच्या अंगावर पडले. पडल्यामुळे ते इथून पळून गेले. आम्ही पळून त्यांची गाडी अडवली. आम्ही रस्त्यावर झोपलो. त्यांनी आमच्या अंगावर गाडी घातली. आमची शिवसेना पूर्वी जशी काम करत होती तसंच काम करेल”, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली.

Leave a Reply